गोंदिया : ओबीसी आरक्षण, रबीतील धानाची खरेदी व ७०० रुपये बोनस यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शासनाच्या विरोधात काढण्यात आलेला मोर्चा, रास्ता रोको व धरणे करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. जिल्ह्यातील प्रत्येकच तालुक्यात शनिवारी (दि.२६) हे आंदोलन करण्यात आले असून संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ओबीसी आरक्षण, रबीतील धानाची खरेदी करण्यात यावी, ७०० रुपये बोनस द्यावा या मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी (दि.२६) आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार, सालेकसा येथे बसस्थानक चौक येथे आंदोलन करणाऱ्या १४ आंदोलकांवर, अर्जुनी-मोरगाव येथील लाखांदूर टी-पॉइंट येथे मोर्चा काढून धरणे आंदोलन करणाऱ्या ७ आंदोलकांवर, गोरेगाव येथील बसस्थानक चौकात रास्ता रोको करणाऱ्या २३ आंदोलकांवर, तिरोडा येथे चंद्रभागा नाका येथे चक्का जाम व जेलभरो आंदोलन करणाऱ्या ५१ आंदोलकांवर, आमगाव येथे आंबेडकर चौकात आंदोलन करणाऱ्या २० आंदोलकांवर, डुग्गीपार येथे दुर्गा व कोहमारा चौक येथे मोर्चा काढून चक्का जाम करणाऱ्या ९ आंदोलकांवर, देवरी येथे रास्ता रोको करणाऱ्या ११ आंदोलकांवर तर शहरातील गुरुनानक गेट येथे रस्त्यावर बसून नारेबाजी करणाऱ्या १७ आंदोलकांवर पोलिसांनी भादंवि कलम १४३, ३४१, १८८, २६९, १३५, १४० सहकलम ५१ (ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ सहकलम २, ३ साथीचे रोग प्रतिबंधक कायदाअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.