गोंदिया : रामनगर व गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात विनाकारण फिरणाऱ्या ६९ जणांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई १ मे रोजी करण्यात आली आहे. या सहा गुन्ह्यात रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार गुन्ह्यांचा समावेश आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुडवा नाका येथे १ मे रोजी दुपारी १२.३० वाजता विनाकारण फिरत असलेल्यांवर पोलीस हवालदार भुरे यांनी कारवाई केली आहे. अपराध क्रमांक १२४/२०२१ भादंविचे कलम १८८,२६९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई कुडवा नाका येथे दुपारी ४.३० वाजता करण्यात आली. त्याच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १२५/२०२१ भादंविच्या कलम १८८,२६९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिसरी कारवाई कुडवा नाका येथे सायंकाळी ५.१५ वाजता दरम्यान करण्यात आली. विनाकारण फिरत असलेल्या तरूणावर रामनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८,२६९ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. चौथी कारवाई रामनगर पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या कुडवा नाका येथे सायंकाळी ६.१५ वाजता करण्यात आली. विनाकारण फिरणाऱ्यावर पोलीस नायक भुते यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८,२६९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाचवी कारवाई गोंदिया शहर पोलिसांनी केली आहे. १ मे रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजताच्या दरम्यान गांधी चौक, नेहरू चौक,यादव चौक,जयस्तंभ चौक गोंदिया २४ जण विनाकारण घराबाहेर फिरताना आढळल्याने पोलीस नायक शिपाई सतीश शेंडे यांनी कारवाई केली. गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८ २६९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहावी कारवाई १ मे रोजी दुपारी १ ते २ वाजताच्या दरम्यान करण्यात आली. शहरातील गांधी चौक, नेहरू चौक, यादव चौक, जयस्तंभ चौकात २३ आरोपी विनाकरण फिरताना आढळले. त्यांना पोलीस नायक योगेश बिसेन यांनी पकडले. त्यांच्यावर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २६२/२०२१ कलम १८८, २६९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सातवी कारवाई १ मे रोजी दुपारी ४ वाजता गांधी चौक,नेहरू चौक,यादव चौक,जयस्तंभ चौक गोंदिया येथे करण्यात आली. १८ जण हे विनाकारण घराबाहेर फिरताना मिळून आले. ही कारवाई पोलीस नायक शिपाई जागेश्वर उईके यांनी केली आहे. संबंधित पोलीस ठाण्यात आरोपींवर भादंविच्या कलम १८८ २६९ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.