गोंदिया : यंदाच्या खरीप हंगामापासून शासनाने पीक पेऱ्याच्या नोंदणीसह कृषीविषयक इतर सर्व कामांसाठी ई पीक ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. मात्र, बरेच शेतकरी अशिक्षित असून, त्यांना अँडाईड मोबाईलची हाताळणी करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली असून, शेतकऱ्यांना यासाठी गावातील सुशिक्षित तरुणांची दाढी धरावी लागत होती. मात्र, आता ही अडचण दूर झाली असून, संकटातील शेतकऱ्यांच्या मदतीला आता कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी धावून आले आहेत.
गाव नमुना, सातबारावर पीक पाहणीच्या नोंदी नोंदविण्याच्या पद्धतीमध्ये शासनाने ३० जुलै २०२१ च्या शासन निर्णयान्वये बदल केला आहे. त्यासाठी विकसित केलेल्या ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांकडून ई-पीक पाहणी थेट भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या याची राज्यभर अमंलबजावणी सुरू आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांना पीक पेऱ्याची माहिती भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. परंतु, अनेक शेतकऱ्यांना ई-पीक ॲपमध्ये माहितीच भरता येत नसल्याने अडचण होत आहे, तर कृषी विभागाने याचे प्रशिक्षणसुद्धा शेतकऱ्यांना दिले नाही. अनेक शेतकऱ्यांकडे अँड्राईड मोबाईल नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. शेतकऱ्यांची ही अडचण दूर होणार असून, त्यांना राज्यभरातील कृषी पदवीधर विद्यार्थी मदत करणार आहेत. ई पीक पाहणी प्रकल्पासाठी कृषी पदवीधर, बीएस्सी ॲग्री रावे विद्यार्थी शेतकऱ्यांना ई पीक पाहणीसाठी मदत करणार आहेत. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी पत्र काढले आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या प्रसार, प्रसिद्धी, प्रबोधन व प्रशिक्षणासाठी राज्यातील शेवटच्या वर्षातील कृषी पदवीधर विद्यार्थी यांना सहभागी करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी परवानगी दिली आहे.
............
ई-पीक ॲपची माहिती देणार
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांचे रावे कार्यक्रम समन्वयक व १६० पेक्षा जास्त कृषी महाविद्यालयांचे ४५० प्राध्यापक आणि ९ हजार ५०० पेक्षा जास्त रावे विद्यार्थी यांना ई-पीक पाहणीचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यातील शासकीय, खासगी विना अनुदानित तत्त्वावरील कृषी महाविद्यालयातील सर्व रावे विद्यार्थी यांना ई-पीक पाहणी प्रकल्पाचे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व प्रबोधन करणार आहेत.
.................
विद्यार्थी येणार बांधावर
शेतकऱ्यांना पीक पेऱ्याची नोंदणी ई-पीक ॲपवर कशी करायची यासाठी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे निश्चितच याची शेतकऱ्यांना मदत होणार आहे.