बोंडगावदेवी : तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने इटखेडा येथे शेतशिवारात हरभरा पिकावर आधारित क्षेत्रीय दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. गावातील प्रगतिशील शेतकरी प्रकाश देशपांडे यांच्या शेतामध्ये आयोजित क्षेत्रीय दिन कार्यक्रमप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी सुधीर वरखडे, कृषी पर्यवेक्षक नरेश बोरकर, कृषी सहायक भारतीय येरणे, पंकज सूर्यवंशी, संध्या बडोले प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
हरभरा, कडधान्य, गळीत धान्य या पिकांचे क्षेत्रवाढ होण्याच्या दृष्टीने तसेच उत्पादनात वाढ होण्याच्या हेतूने कृषी विभागाच्या वतीने शिवारफेरीच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शेतकरी महिला, पुरुषांना मार्गदर्शन करताना मंडळ कृषी अधिकारी सुधीर वरखडे यांनी हरभरा व इतर कडधान्य याबाबतची माहिती दिली. उत्पादनात वाढ व क्षेत्रविस्तार होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक नरेश बोरकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांसंबंधी माहिती दिली. कृषी सहायक पंकज सूर्यवंशी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हरभरा पिकाची लागवड करणे, रुंद वरंबा सरी पध्दतीने लागवड, जमिनीची आरोग्यपत्रिका आधारावर शिफारीशीत, खत मात्रा देवून खत व्यवस्थापन करणे, कामगंध सापळे, निंबोळी अर्क, सापळा पीक यासारख्या बाबींच्या हरभरा पिकासाठी वापर करणे याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन कृषी सहाय्यक भारती येरणे यांनी केले तर संध्या बडोले यांनी आभार मानले.