गोंदिया : मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणाचा विमा काढला होता. विमा हप्त्याच्या शेतकरी आणि शासनाने १६ कोटी ४० रुपये विमा कंपन्यांकडे भरले. खरीप हंगामात धान पिकांचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांनी केवळ ४३३३ शेतकऱ्यांना मदतीस पात्र ठरवीत केवळ ६२ लाख रुपये ३३ हजार रुपयांचा परतावा मंजूर केला आहे. त्यामुळे विमा कंपन्या केवळ स्वत:चेच हित साधत असल्याचे बिकट चित्र आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसानभरपाई मिळावी यासाठी दरवर्षी जिल्ह्यातील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्ता भरून पिकांचा विमा काढतात. मात्र, मागील तीन-चार वर्षांपासूनचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अनुभव पाहता विमा कंपन्या या केवळ स्वत:चेच हित साधत असल्याचे दिसून येते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची नुकसानभरपाई मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण ५६६४० शेतकऱ्यांनी २८९१५.५ हेक्टरमधील पिकांचा पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा उतरविला. विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी २ कोटी २० लाख रुपये, राज्य आणि केंद्र सरकारने १४ कोटी २८ लाख, असे एकूण १६ कोटी ४८ लाख रुपये विमा कंपनीकडे भरले. खरीप हंगामात परतीचा पाऊस आणि कीड रोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी याची माहिती वेळेत विमा कंपन्यांना दिली. त्यांनी पंचनामे सुद्धा केले; पण मदतीसाठी केवळ ४३३३ शेतकऱ्यांना पात्र ठरवीत नुकसानभरपाईपोटी केवळ ६२ लाख ३३ हजार रुपयांचा परतावा दिला. त्यामुळे १६ कोटी रुपये विमा कंपन्यांच्याच घशात गेल्याचे चित्र आहे.
............
काढणीपश्चात नुकसानीसाठी केवळ ५१ शेतकरी पात्र
गेल्या खरीप हंगामात धान कापणीच्या कालावधीत परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हजारो हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीने केवळ काढणीपश्चात पिकांच्या नुकसानभरपाईसाठी ५१ शेतकऱ्यांना पात्र ठरविले. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसान होऊनदेखील मदत मिळण्यापासून वंचित राहिले.
......
केवळ दोनच तालुक्यांतील शेतकऱ्यांना भरपाई
मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असला तरी विमा कंपनीने केवळ गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील ४३३३ शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरविले. उर्वरित शेतकऱ्यांना कुठल्या आधारावर अपात्र ठरविण्यात आले, याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
.........
म्हणून पीक विम्याबाबत उदासीनता
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन आणि पिकांचा विमा काढल्यानंतरही नुकसानभरपाई मिळत नसल्याने दिवसेंदिवस पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. मागील चार वर्षांत दीड लाख पीक विमाधारक शेतकऱ्यांची संख्या आता ५० हजारांवर आली आहे. हे सगळे फलित विमा कंपन्यांच्या धोरणाचेच आहे.
..........
जिल्ह्यातील एकूण पीक विमाधारक शेतकरी : ५६६४०
विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम : २ कोटी २० लाख
केंद्र आणि राज्य सरकारने उचललेला वाटा : १४ कोटी २८ लाख
नुकसानभरपाईला पात्र ठरलेले शेतकरी : ४३३३
शेतकऱ्यांना मिळालेला एकूण परतावा : ६२.३३ लाख रुपये
.................