काचेवानी : तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तिरोडाने उद्दिष्टापेक्षा अधिक पीक कर्जाची वाटणी केलेली आहे. तिरोडा बँक अंतर्गत ३० आणि परसवाडा अंतर्गत १२ सोसायट्या मिळून ४२ सोसायट्यांतर्गत येणाऱ्या एक हजार ८११ लाभार्थ्यांना ६ कोटी ५६ लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, शेतीकामात आर्थिक मदत व्हावी, याकरिता केंद्र व राज्य शासनाने कमी व्याजदरावर पीक कर्ज देण्याची योजना आखली. हे पीक कर्ज शेतकऱ्यांकरिता अतिशय लाभदायक ठरले. मात्र निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी कमी दराने मिळणारा कर्ज भरण्यास अपयशी ठरतो. यातून देण्यात आलेले कर्ज थकीत होवून शेतकरी कर्जबाजारीच होतो. तिरोडा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-आॅपरेटिव्ह बँकचे शाखा व्यवस्थापक जे.पी. पवार यांनी सांगितले की, तिरोडा शाखांतर्गत ३० सेवा सहकारी सोसायट्या आहेत. परसवाडा शाखेतंर्गत १२ अशा एकूण ४२ सोसायट्या असून खरीप हंगामाकरिता देण्यात येणारे पीक कर्जाचे उद्दिष्ट ५ लक्ष ५१ लाख रुपये होते. मात्र आतापर्यंत सदर बँकेने ६ कोटी ५६ लाख रुपयांचे पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटप केले आहे. शेतकरी सभासद लाभार्थ्यांची संख्या एक हजार ८११ आहे. शाखा व्यवस्थापक जे.पी. पवार यांना पीक विम्यासंबंधी विचारले असता, त्यांनी सांगितले की, दोन-तीन वर्षापूर्वी पीक विमा आवश्यक होता. परंतु या वर्षापासून (२०१४-१५) ऐच्छीक झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा घ्यायचे आहे, त्यांच्याकडून अर्ज लिहून घेतल्यानंतर पीक विमा रक्कम स्वीकारली जाते. (वार्ताहर)
तिरोडा तालुक्यात ६.५६ कोटींचे पीक कर्जवाटप
By admin | Published: August 20, 2014 11:37 PM