गोंदिया : शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन पीक उत्पादनात वाढ व्हावी, यादृष्टीने येत्या खरिपात कृषी विभागामार्फत पीक उत्पादकता वाढ मोहीम हाती घेतली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया तसेच रासायनिक खतांच्या वापरात १० टक्के बचत करणे या दोन बाबींवर भर दिला जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात २१ ते २८ मे या कालावधीत कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी जसे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया याबाबतचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले जाणार आहे. पीक उत्पादकता वाढ सप्ताह साजरा केला जाणार आहे.
बियाणे उगवण क्षमता तपासणीमुळे चांगल्या बियाणांचा दर्जा शेतकऱ्यांना कळणार आहे. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येणार नाही तसेच बियाण्यास बीज प्रक्रिया केल्यास पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता कमी असते. यासाठीच २१ मे हा दिवस सर्व कृषी विभागामार्फत ‘बीज प्रक्रिया दिन’ म्हणून सर्व कृषी कर्मचाऱ्यांमार्फत एकाचदिवशी व्यापक प्रमाणात राबवला जाणार आहे. तसेच रासायनिक खतांचा वाढत असलेला बेसुमार वापर, यामुळे बिघडत चाललेले जमिनीचे आरोग्य व वाढत असलेला उत्पादन खर्च कमी व्हावा, या उद्देशाने रासायनिक खतांची १० टक्के बचत या बाबींवरसुध्दा भर दिला जाणार आहे. याअंतर्गत मातीची तपासणी करून जमीन आरोग्य पत्रिकेआधारे शिफारस केलेली खते वापरण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे गरज नसलेल्या खतांचा वापर होणार नाही व अनावश्यक खतांवर होणारा खर्च कमी होणार आहे. त्यासाठी २८ मे हा ‘खत बचत जनजागृती दिवस’ म्हणून सर्वच कृषी कर्मचाऱ्यांमार्फत एकाचदिवशी व्यापक स्वरुपात राबवण्यात येणार आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी गावातील कृषिमित्र, कृषिसखी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, प्रगतशील शेतकरी, कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी, सहकारी संस्था, बचतगट यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व आपल्या पीक उत्पादकतेमध्ये वाढ करून घ्यावी. त्याकरिता कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी कळविले आहे.