आज अष्टमीची पूजा : ठिकठिकाणी रास गरबा आणि दांडियाची धूम२गोंदिया : शहरातील नवरात्रोत्सवाची दूरवर ख्याती आहे. त्यामुळेच शहरात दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. रात्रीच्या वेळी शहरात पाय ठेवायला जागा राहणार नाही अशी स्थिती निर्माण होत आहे. त्यात आता शेवटचे दोन दिवस उरले असून शहरासह ग्रामीण भागातील भाविक दर्शनासाठी शहराकडे घाव घेत आहे. या सर्व हालचालींवर पोलीस विभाग नजर ठेवून आहे. शहरातील नवरात्रोत्सवाची आपली एक परंपरा आहे. यामुळेच येथील नवरात्रोत्सवाची शेजारील जिल्ह्यांसह लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातही ख्याती आहे. येथील नवरात्रोत्सवाचे वैभव बघण्यासाठी यामुळेच मोठ्या संख्येत भाविक शहराकडे धाव घेतात. यातही पंचमीनंतर भाविकांच्या गर्दीचे प्रमाण वाढत असून शहर भरभरून निघते. नवरात्रोत्सवा सोबतच आता शारदा माताही विराजमान असल्याने भाविक दर्शनासाठी एकच गर्दी करीत आहे. आता नवरात्रोत्सवाचे अंतीम दोनच दिवस उरल्याने मोठ्या संख्येत भाविक शहरात दाखल होत आहेत. हेच कारण आहे की, रात्रीच्या वेळी भाविकांची गर्दी वाढत असून पाय ठेवायलाही जागा उरत नाही. शिवाय भाविकांच्या गर्दीमुळे रेल्वे, एसटी भरभरून चालत असतानाच शहरातील आॅटो व रिक्शावालेही व्यस्त झाले आहेत. दुर्गा व शारदा माता विराजमान असून नवरात्रोत्सवानिमित्त गरबांचेही आयोजन करण्यात येत असल्याने शहरात पुरूषांसोबतच महिला व तरूणींचाही वावर दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)शहरात ५३ दुर्गा ३६ शारदा उत्सव व १५ गरबा शहरात यंदा ५३ दुर्गा व ३६ शारदा उत्सव साजरे केले जात असून नवरात्रीनिमित्त १५ ठिकाणी गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहर पोलीस ठाण्यांतर्गत ३२ दुर्गा, १४ शारदा उत्सव व ८ ठिकाणी गरबा आहे. तर रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत २१ दुर्गा, २२ शारदा उत्सव व ७ ठिकाणी गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गरबामध्ये महिलांचा सहभाग राहत असल्याने गरबांच्या ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तासोबतच अधिकारीही पेट्रोलींग करून नजर ठेवून आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त शहरात दररोज हजारोंच्या संख्येत भाविकांची गर्दी येत असल्याने काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. यांतर्गत शहर पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला यांच्यासह त्यांचे एक सहायक पोलीस निरीक्षक व तीन पोलीस उपनिरीक्षक जातीने नजर ठेवून आहेत. तर प्रत्येक मंडळाला दोन पोलीस कर्मचारी व दोन होमगार्ड देण्यात आले आहेत. शिवाय निर्भया पथक व मार्शल पेट्रोलींगचे पथक सातत्याने पेट्रोलींग करीत आहेत. शहरातील गांधी प्रतिमा चौकात मोठ्या संख्येत गर्दी राहत असल्याने येथे एक पोलीस अधिकारी नियमीत करण्यात आले आहेत. शिवाय रामनगर पोलिसांकडूनही गरजेनुसार बंदोबस्त लावला जात असून त्यांचेही अधिकारी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. अष्ठमीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन अष्ठमी नंतर माता दोनच दिवस विराजीत राहत असून अष्ठमीनिमित्त शहरात ठिकठिकाणी भाविकांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शहरात मातेच्या स्थापनेपासूनच महाप्रसाद वितरीत केला जात आहे. यात काही ठिकाणी नि:शुल्क तर काही ठिकाणी नाममात्र शुल्क घेऊन महाप्रसादाचे वितरण केले जात आहे. ग्रामीण भागातून देवी दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांसाठी हा महाप्रसाद आधार ठरतो. रविवार व सोमवारी रात्री १२ पर्यंत परवानगी मंडळांकडून ध्वनी प्रदूषण होऊ नये यावर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायालयाने ध्वनी क्षमता बांधून दिली असतानाच काही दिवस सुद्धा बांधून दिले आहेत. त्यानुसार आता नवरात्रोत्सवाचे शेवटचे दोनच दिवस उरले असल्याने रविवारी व सोमवारी रात्री १२ वाजतापर्यंच ध्वनीक्षेपण वाजविण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर मंगळवारी विसर्जनाच्या दिवशी रात्री १० वाजतापर्यंतच मोठ्या आवाजात डिजे किंवा बँड वाजविण्याची परवानगी देण्यात आली आहे.
गोंदियातील नवरात्रौत्सवात भाविकांची गर्दी
By admin | Published: October 09, 2016 12:45 AM