गोंदिया : राज्य सरकारने पाच टप्प्यात सोमवारपासून अनलॉक जाहीर केला आहे. गोंदिया जिल्ह्याचा पाॅझटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने आणि ऑक्सिजन बेडची संख्यासुध्दा २५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने जिल्ह्याचा पहिल्याच स्तरात समावेश करत जिल्हा अनलॉक करण्यात आला. मात्र अनलॉक होता सोमवारी पहिल्याच दिवशी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचेसुध्दा उल्लघंन करण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट मागील तीन दिवसांपासून १ टक्क्याच्या आतच आहे. त्याच सोमवारपासून (दि.७) जिल्हा अनलॉक करण्यात आला. अनलॉक होताच सोमवारी सकाळपासून ग्राहकांनी शहरातील भाजीबाजार आणि बाजारपेठेत विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. जिल्ह्यातून कोरोनाचा पूर्णपणे प्रादुर्भाव संपला असून, कोरोनाचा कुठलाही धोका नसल्यासारखे नागरिक वावरत हाेते. मोबाइल तसेच इतर वस्तूंच्या दुकानांमध्ये तर अक्षरश: नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. ग्राहकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पूर्णपणे उल्लघंन केले जात होते, तर दुकानदारांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि सॅनिटायझर ठेवण्याचा विसर पडल्याचे चित्र पहायला मिळाले, तर असेच काहीसे चित्र रेस्टारेंटमध्ये पहायला मिळाले. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, त्याचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. मात्र नागरिकांचा असाच बेजबाबदारपणा कायम राहिल्यास कोराेनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे शिथिल झाले आहेत, मात्र कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे.
..............
पालिकेच्या पथक झाले गायब
सोमवारपासून जिल्हा अनलॉक करण्यात आला. त्यामुळे निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आले. मात्र प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सूचना नागरिक आणि व्यावसायिकांना केल्या आहे. याचे पालन केेले जाते किवा नाही याची पाहणी करण्यासाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे पथक गठित करण्यात आले आहे; पण अनलॉकच्या पहिल्याच दिवशी हे पथक गायब झाल्याचे चित्र होते.
..........
वाहतुकीची कोंडी, वाहतूक शिपाई दिसेना
सोमवारी अनलाॅक होताच नागरिकांनी सकाळपासून शहरातील गोरेलाल चाैक, दुर्गा चौक, नेहरू चौक, चांदणी चौक आणि गांधी प्रतिमा परिसरात गर्दी केली होती. त्यातच दुचाकी आणि चार चाकी वाहनांची भर पडल्याने वाहतुकीची पूर्णपणे कोंडी झाली होती. दर पाच मिनिटाला वाहतूक जाम होत होती; पण वाहतूक नियंत्रण पोलीस शिपायांचा कुठेच पत्ता नव्हता.
.........
चेहऱ्यावरील मास्क झाले गायब
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने प्रशासनाने जिल्हा सोमवारपासून पूर्णपणे अनलॉक केला आहे. पण हे करतानाच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. तसेच मास्क, सॅनिटायझर यांचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र पहिल्याच दिवशी नागरिकांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करत मास्क लावणे टाळल्याचे चित्र होते.
.........
नियमांकडे दुर्लक्ष म्हणजे पुन्हा कोरोनाला निमंत्रणच
जिल्हा अनलॉक झाला म्हणजे कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे कमी झाला असा नव्हे, तर धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी जेवढी काळजी आधी घेतली तेवढीच पुन्हा घेण्याची गरज आहे. अन्यथा, आपले दुर्लक्ष कोरोनाला पुन्हा आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे नियमांचे पालन करुन स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या.