इसापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव होत असून अशात जिल्ह्यात जमावबंदी व कोरोना प्रतिबंधक कलम जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केली आहे. असे असतानाही पानठेल्यात गर्दी करणाऱ्या पानठेला चालकांना अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी दणका देत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी (दि. ८) व शनिवारी (दि. १०) या कारवाया करण्यात आल्या आहेत.
यांतर्गत, गुरुवारी (दि. ८) अर्जुनी-पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम धाबेटेकडी येथे अनिल दसाराम हातझाडे (३२) व मोहन दसाराम हातझाडे सायंकाळी ६.४५ वाजतादरम्यान आपल्या घरासमोरील पानटपरीत वरली मटक्यावर सट्टापट्टीचा जुगार खेळविण्याचा उद्देशातून ग्राहकांची गर्दी जमवून होते. अशात पेट्रोलिंगवर असलेल्या पोलीस नायक योगेश मुनेश्वर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी दोघांवर कलम १८८, २६९ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस नायक बेहरे करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत, शनिवारी (दि.१०) सायंकाळी ६ वाजतादरम्यान ग्राम सिंगलटोली येथे हेमराज सुरेश सहारे (३५) हा पानटपरीवर ग्राहकांची जमवून सामान विकत असताना दिसून आला. अशात गस्तीवर असलेल्या पोलीस नायक विजय कोटांगले यांच्या तक्रारीवरून कलम १८८, २६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कन्नाके करीत आहेत.