लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळी आता एका दिवसावर आली असून बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सध्या जिल्हा कोरोनामुक्त आहे ही दिलासादायक बाब असली तरी ही गर्दी नियमांना डावलून होत असल्याने मात्र धोका दिसून येतो. आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याचे बोलले जात असल्याने हलगर्जीपणा करणे उचित नसून तोंडावर मास्क आजही अत्यावश्यक असून नागरिकांनी आता स्वत: काळजी घेणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही अंगावर काटे आणणारा आहे. गेलेले ते दिवस परतून येऊ नये यासाठी शासनाने लसीकरणावर जोर दिला व जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणासाठी आजही धडपड सुरूच आहे. याचेच फलित आहे की, तिसरी लाट पुढे-पुढे ढकलण्यात शासनाला यश आले आहे. मात्र राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येताच देण्यात आलेली सुट आता नियमांना डावलणारी ठरत आहे. आजघडीला सर्वच निर्बंध उठविण्यात आले आहेत. त्यात जिल्हा कोरोनामुक्त झाला असून जिल्हावासीयांना रान मोकळे झाले आहे. हेच कारण आहे की, गणेशोत्सवापासून वाढत चाललेली गर्दी नियमांना डावलून आपल्या मर्जीने वावरत आहे. त्यात नवरात्रोत्सवापासून दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी वाढू लागली व आजघडीला बाजारात पाय ठेवायला जागाही असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र ही गर्दी नियमांना डावलून होत असून बहुतांश नागरिक तोंडावर मास्क न लावताच फिरताना दिसत आहेत. त्यात शारीरिक अंतराचे पालन व सॅनिटायझरचा वापर एखाद्या ही दुकानात होताना दिसत नाही हे विशेष. मात्र ही बाब धोकादायक असून वेळीच नियमांचे पालन व तोंडावर मास्क आजही गरजेचा आहे.
तिसरी लाट न परवडणारी - कोरोनाच्या दोन लाटांमध्ये दोनदा लॉकडाऊन करण्यात आले असून या दोन्ही लाटांमध्ये लाखो लोकांचा जीव गेला असून अवघ्या देशाची अर्थव्यवस्था विस्कटली आहे. त्यात आता पुुन्हा एकदा गर्दी वाढू लागली असून नियमांना धुडकावले जात आहे. अशात तिसरी लाट आल्यास मात्र हे देशाला तसेच देशवासीयांना ही परवडणारे राहणार नाही. यामुळे नियमांचे पालन हेच येणाऱ्या काळासाठी फायद्याचे राहणार आहे. लस घेणे हाच उपाय - देशात झपाट्याने होत असलेल्या लसीकरणामुळे आतापर्यंत तिसरी लाट आलेली नाही. यामुळे लस घेणे हाच एकमात्र उपाय असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. मात्र त्यानंतरही कित्येक नागरिक लस घेणे टाळत आहेत. त्यांची हीच चूक कोरोनाला पाय पसरण्यासाठी पोषक ठरते. आता कोरोनाला मात देण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे.