गोंदिया : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून शहर; तसेच लगतच्या ग्राम कुडवा व कटंगीला पाणीपुरवठा केला जातो; मात्र डांगोरली येथील पंप हाऊस ‘लो व्होल्टेज’ असल्यामुळे एकच पंप चालविता येत आहे. याचा फटका मात्र पाणीपुरवठ्याला बसत असून, दोनऐवजी फक्त एकच वेळी पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी शहरवासीयांची पाण्यासाठी ओरड सुरू असून त्याला ‘लो व्होल्टेज’ कारणीभूत आहे.
गोंदिया शहरासह लगतच्या ग्राम कुडवा व कटंगीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी मजिप्रकडे सुमारे २४००० कनेक्शनधारक आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी गोंदिया शहरात ५, तर ग्राम कुडवा येथे १ व कटंगी येथेही १ पाणी टाकी असून, दिवसाला १५ दशलक्ष लिटर पाणी दिले जात आहे. डांगोरली येथील पंप हाऊसमधून शहर व कुडवा आणि कटंगीला पाणीपुरवठा केला जात असून, त्यासाठी डांगोरली पंप हाऊसमध्ये दोन पंप लावण्यात आले आहेत. हे दोन पंप नियमित सुरू राहिल्यास या ७ टाक्यांना पाणीपुरवठा करून भरता येते; मात्र मागील महिनाभरापासून डांगोरली पंप हाऊसला कमी वीज दाब येत असल्यामुळे फक्त एकच पंप चालवावा लागत आहे. यामुळे पाण्याच्या टाक्या पाहिजे त्या पातळीवर भरल्या जात नाहीत.
परिणामी शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन विस्कळीत झाले असून नाइलाजास्तव फक्त एकच वेळ पाणीपुरवठा करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीकडून कमी वीज दाबाची समस्या सोडविण्यात आली तर पंप हाऊसमधील दोन्ही पंप चालवून पाण्याच्या टाक्या भरता येतील. यानंतर शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करता येईल. यासाठी मजिप्राकडून महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्रही देण्यात आले आहे; मात्र त्यांच्याकडून कमी वीज दाबाच्या या समस्येवर काहीच तोडगा काढून समाधान करण्यात आले नाही. परिणामी एक वेळच पाणीपुरवठा केला जात असून, पाण्यासाठी शहरवासीयांच्या ओरडला कमी वीज दाब करणीभूत आहे.
रामनगर, भीमनगर व सिव्हील लाइन्सला फटका
कमी वीज दाबामुळे पंप हाऊसमधील फक्त एकच पंप सुरू करता येत आहे; मात्र एका पंपद्वारे पाण्याच्या टाक्या पाहिजे त्या पातळीवर भरल्या जात नाहीत. परिणामी एकच वेळ पाणीपुरवठा सुरू असून त्यातही याचा सर्वाधिक फटका रामनगर, भीमनगर व सिव्हील लाइन्सवासीयांना बसत आहे. या परिसरांमध्ये एकच वेळ पाणीपुरवठा केला जात असून नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
४००-४३० व्होल्ट वीज दाबाची मागणी- मजिप्राने घेतलेल्या नोंदीनुसार, १२ जुलैपासून पंप हाऊसला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत ३७०-४०० व्होल्ट वीज दाब मिळत आहे. तर पंप हाऊसमध्ये २४० एचपीचे ३ पंप सेट बसविण्यात आले आहेत. अशात दोन पंप सुरू केल्यास वीज दाब कमी होऊन ३८० व्होल्टपर्यंत येतो. परिणामी दोन पंप चालविणे शक्य होत नाही. एकच पंप सुरू असल्याने टाक्या भरत नाही. पाणीपुरवठा फक्त एकच वेळ करावा लागत आहे. अशात ४०० ते ४३० व्होल्टपर्यंत वीज दाब पुरवठा करण्याची मागणी मजिप्राने महावितरणकडे केली आहे. यासाठी १३ जुलै रोजी निवेदन देऊनही समस्या सुटलेली नाही.