लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रातील सीटी-१ नरभक्षी वाघ गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी वनपरिक्षेत्रात दाखल झाला आहे. त्यामुळे वन व वन्यजीव विभागाने जंगलात असलेल्या गावकऱ्यांना जंगल परिसरात न जाण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच ग्रामपंचायतींनी यासंदर्भात दवंडी देऊन जनजागृती करण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे केशोरी परिसरात सीटी-१ नरभक्षी वाघाची दहशत निर्माण झाली आहे. सीटी-१ या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात तीन ते चारजणांचा बळी घेतला आहे. या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात मागील आठवडाभर चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, हा वाघ आता गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यातील केशाेरी वनपरिक्षेत्रातील जंगलात दाखल झाला आहे. वन विभागाचे कर्मचारी आणि गावकऱ्यांना हा वाघ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव वनक्षेत्रात आढळला. हा वाघ नरभक्षी असल्याने त्याच्यापासून गावकऱ्यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन व वन्यजीव विभागाने या परिसरातील सर्व ग्रामपंचायतींना शनिवारी (दि.२४) पत्र देऊन सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच लाकडे, गुरे चराई आणि इतर कामांसाठी जंगल परिसरात जाण्यास गावकऱ्यांना मनाई केली आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतने गावात दवंडी देऊन गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत. सीटी-१ वाघ केशाेरी वनपरिक्षेत्रात दाखल झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या खरीप हंगामातील धानातील निंदण काढण्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी सकाळपासूनच शेतावरच असतात. अशात आता या सीटी-१ वाघ या परिसरात दाखल झाल्याने शेतकऱ्यांवर शेतीची कामे बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
वाघासह हत्तीच्या कळपाची दहशत गडचिरोली जिल्ह्यातून हत्तीचा कळप गोंदिया जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात दाखल झाला. शनिवारी हा हत्तीचा कळप वडेगावजवळील नदी परिसरात आढळला. हे हत्ती केशोरी वनपरिक्षेत्रात दाखल होण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या परिसरातील गावकऱ्यांना सीटी-१ वाघानंतर आता हत्तीच्या कळपानेसुद्धा दहशत निर्माण केली आहे.
केशोरी वनपरिक्षेत्रात सीटी-१ हा नरभक्षी वाघ दाखल झाला आहे, तर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेतून हत्तीचा कळपसुद्धा या परिसरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या असून जंगल परिसरात गुरे चराई, लाकडे आणण्यासाठी व इतर कामांसाठी जाण्यास मनाई केली आहे. नागरिकांना सूचना केली आहे. - सी. व्ही. नान्हे, वनक्षेत्र सहायक केशोरी.