संतोष बुकावन
अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : मुबलक प्रमाणात पोषकद्रव्ये असलेल्या झुकिनी नामक अमेरिकन भाजीची अर्जुनी मोरगावच्या मातीत लागवड झाली आहे. उच्चशिक्षित महिला शेतकरी नीता ओंकार लांजेवार यांनी आपल्या ब्राह्मणटोला येथील शेतशिवारात हा नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे मुबलक प्रमाणात झुकिनी भाजीच्या झाडांना फळे आली आहेत.
झुकिनी हा एकप्रकारचा भाजीचा भोपळा आहे. या भाजीचे उगमस्थान अमेरिका आहे. इटालियन लोकांनी या भाजीच्या लागवडीत अधिक सुधारणा करून त्यास झुकिनी असे संबोधले. झुकिनी हे इटालियन नाव आहे. इटलीतून या भाजीचा प्रसार अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, फ्रान्स, तुर्कस्तान ब्राझील, चीन, जर्मनी व भारत आदी देशांत झाला. झुकिनीची शास्त्रीय नावे कुकुरबिटा मॅझिमा व कुकुरबिटा पेपो अशी आहेत. या भाजीची झाडे बुटकी व झुडूपवजा असतात. विविध पद्धती वापरून झुकिनीचे आहारात सेवन करतात. भारतात झुकिनीचे बारीक तुकडे तयार करून कोशिंबीर म्हणून खाण्यासाठी वापरतात. काकडी आणि दुधी भोपळ्याची मिश्रित चव असते. या भाजीचे फळ काकडीसारखेच आकाराने दिसणारे गर्द हिरवे, पोपटी, राखाडी व पिवळ्या रंगाचे असते. भारतात मोठमोठ्या शहरांतील पंचतारांकित व मोठ्या हॉटेल्समधून झुकिनीला प्रचंड मागणी असते. पूर्व विदर्भात तर ही भाजी दुर्मीळच आहे. अनेकांनी या भाजीचे नावच ऐकलेले नाही. मात्र, झुकिनीच्या लागवडीमुळे आता गोंदिया जिल्ह्यातून विदेशात भाज्या निर्यात केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा या भाजीपाला पिकाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
..........
झुकिनीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे
झुकिनी या भाजीत भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे, तंतुमय व स्निग्ध पदार्थ असतात. पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित करणे तसेच हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी झुकिनी फळ महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील शेतकरी अगदी लहान क्षेत्रात याची लागवड करतात.
210821\img-20210821-wa0009.jpg
झुकीनी भाजीफळासोबत महिला शेतकरी निता लांजेवार