गोंदिया : सायबर गुन्हेगारांकडून सर्वसामान्य, मोठमोठ्या सेलिब्रिटी, व्यापारी, उद्योजकांना गंडा घालण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जातात. सध्या ‘हनी ट्रॅप’चा नवा फंडा वापरून अनेकांना लाखाेंचा गंडा घालण्याचा सपाटाच सायबर गुन्हेगारांनी सुरू केला आहे.
समाजातील आपल्या इज्जतीला घाबरून अशा घटनांमध्ये फसविले गेलेले बहुतांश जण पोलिसांत तक्रार करीत नाहीत. सोशल मीडियातील फेक अकाउंटवरून गुन्हेगार डाव साधत असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढत चालली आहे. वैवाहिक जीवनातील कलह, जोडीदाराकडून लैंगिक अपेक्षा अपूर्ण, कमी वयात झालेले लग्न, घटस्फोट, अधिकचा पैसा अशा गोष्टींमुळे समाजातील काही लोक ‘हनी ट्रॅप’ला बळी पडत आहेत.
अशा लोकांच्या मोबाईलवर सोशल मीडियाद्वारे एखाद्या सुंदर महिलेची अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट येते व त्यानंतर औपचारिक ‘चॅटिंग’ सुरू होते. काही कालावधी जाताच व्हिडिओ कॉलिंग सुरू होते. अश्लील हावभाव आणि संवाद रेकॉर्ड केले जातात व त्यानंतर पैशांची मागणी होते. नकार दिला तर रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आणि चॅटिंग व्हायरल करून बदनामी करायची धमकी देत ब्लॅकमेलिंग केली जाते. अनेकजण गुन्हेगारांच्या दबावाला बळी पडतात आणि लाखो रुपयांना गंडविले जातात.
अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारलेली बरी
१) सुरुवातीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून साधारण बोलचाल केली जाते. हळूहळू रंगात येऊन पुरुषांना उत्तेजना मिळेल अशा गप्पा मारल्या जातात. त्यानंतर अश्लील फोटो, व्हिडिओ पाठवून व्हिडिओवर अश्लील चाळे केले जातात.
२) धनाढ्य पुरुषांना लुटने हाच एकमेव प्रयास यातून होत असतो. ‘हनी ट्रॅप’ करण्यासाठी या प्रकारात महिलांचा वापर करून फसविले जाते. धनाढ्य लोकांना या जाळ्यात ओढले जाते.
३) एकदा जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीला गंडविल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. पैसा न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली जाते.
राजकारणीही निशाण्यावर
या प्रकारच्या जाळ्यात सेलिब्रिटी, राजकारणी, इतर क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींना ओढले जाते. फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियातील ॲप्सचा वापर यासाठी केला जात आहे. ‘हनी ट्रॅप’ करण्यासाठी फेक अकाउंटचा वापर केला जात आहे. समाजातील नामवंत व्यक्तींना लाखोंचा गंडा घातला जातो. परंतु, अनेकजण नाव खराब होऊ नये म्हणून अशा गुन्ह्यांची तक्रार पोलिसात करीत नाही.