तिराेडा : तालुक्यात गुरुवारी आलेल्या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका नवेगाव (धापेवाडा) या गावाला बसला. चक्रीवादळामुळे गावातील अनेक नागरिकांच्या घरावरील छत उडाले, तर घरांचीसुद्धा पडझड झाली. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
चक्रीवादळामुळे नवेगाव (धापेवाडा) येथील अनेक नागरिकांच्या घरावरील छप्पर उडाल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे, तर चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाचा फटका रबी हंगामातील धान पिकांनासुद्धा मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळे शेतकऱ्यांवरसुद्धा आर्थिक संकट ओढावले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून, कोरोनाच्या संसर्गामुळे घराचे बांधकाम करणेसुद्धा अवघड असल्याने नागरिकांना उन्ह, वारा, पावसाचा मारा सहन करीत उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून येथील नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे, तसेच चक्रीवादळाने जे लोक बेघर झाले त्यांना खावटी अन्नधान्याचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.