गोंदिया : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी या दोन्ही जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. हिच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी राईटेक कंपनीचे व्यवस्थापकांशी चर्चा करुन रेमडेसिविर इंजेक्शनचा स्टॉक उपलब्ध करुन देण्यास सांगितले. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन गुरुवारी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
संपूर्ण राज्यात सध्या कोरोनाचा उद्रेक झाल्याने बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्यावर उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे. एकाच वेळी या इंजेक्शनची मागणी वाढल्याने सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. गोंदिया आणि भंडार जिल्ह्यात सुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून त्याची अतिरिक्त दराने विक्री केली जात असल्याची चर्चा आहे. परिणामी गोरगरीब आणि सामान्य रुग्णांची परवड होत आहे. हिच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी राईटेक कंपनीच्या व्यवस्थापकांशी चर्चा करुन रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यास सांगितले. त्यानंतर या कंपनीने दोन्ही जिल्ह्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले आहे. विशेष म्हणजे माजी आ. राजेंद्र जैन यांनी सुद्धा जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याची बाब खा. प्रफुल्ल पटेल यांच्या लक्षात आणून दिली होती.
........
निर्धारित दरानेच होणार पुरवठा
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील सर्व मेडिकलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याची शासनाने निर्धारित केलेल्या दरानेच ग्राहकांना विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना सुद्धा अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नसल्याचे माजी आ. राजेंद्र जैन यांनी सांगितले.