आमगाव : तालुक्यातील मौजा दहेगाव येथील पाणीपुरवठा योजनेचे बिल न भरल्यामुळे गावाचा पाणीपुरवठा बंद होता. यावर पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी तालुका प्रहार संघटनेच्या वतीने ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय अभियंता (देवरी) यांना मंगळवारी (दि.१०) निवेदन दिले होते. याची दखल म्हणून उपविभागीय अभियंत्यांनी सरपंचांसोबत चर्चा केली व त्यांनी बिल भरण्याची तयारी दाखविल्याने त्यानंतर लगेच पाणीपुरवठा सुरू होणार आहे.
दहेगाव येथील नळपाणीपुरवठा योजना मागील ६ महिन्यांपासून ग्रामपंचायतीने वीजबिल न भरल्यामुळे बंद पडलेली आहे. गावकऱ्यांच्या या समस्येला बघता प्रहार संघटनेने ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्यालय (देवरी) यांना निवेदन सादर केले होते. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. यावर उपविभागीय अभियंत्यांनी दहेगाव ग्रामपंचायत सरपंचांशी चर्चा केल्यानंतर सरपंचांनी वीजबिल भरण्याची तयारी दर्शविली. यावर उपविभागीय अभियंत्यांनी वीजबिल भरल्यानंतर ताबडतोब नळयोजना सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यासाठी प्रहार संघटना तालुकाप्रमुख सुनील गिरडकर, शहरप्रमुख मनोज हत्तीमरे, दहेगाव शाखाप्रमुख राजेंद्र पारधी, राहुल शेंदरे, बंटी बावनथडे, मनोज येरणे, विलास पुडे, दिनेश बावनकर, सुभाष यू.के., चंदू बड़वाईक, मनोज येरणे, सुनील बिसेन, अतुल शेंद्रे, संतोष उके, जितेंद्र भेलवे यांनी सहकार्य केले.