लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अल्पशी शेती व रोजगार हमीचे काम यातून कुटुंबातील पाच जणांचा उदरनिर्वाह सांभाळणे कठिण जात होते. अशातच सालेकसा तालुक्यातील ग्राम निंबा येथील एकता स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सदस्य पुष्पलता टेकचंद कटरे यांनी गटातून कर्ज घेवून म्हशी खरेदी केल्या. तसेच दुग्ध विक्रीतून कुटुंबाच्या पालनपोषणासह तिन्ही मुलींचे शिक्षणही करीत आहेत.पुष्पलता यांच्या कुटुंबात त्या, पती व तीन मुली आहेत. दीड एकर शेती व रोजगार हमीच्या कामातून परिवाराचा खर्च चालत होता. मात्र आर्थिक टंचाई नेहमीच भासायची. अशात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) सीआरपी गट स्थापनेसाठी त्यांच्या घरी आल्या. तेव्हा त्यांची गटात येण्याची मानसिकता नव्हती. त्यानंतर काही दिवसांनी सीआरपी व सहयोगिनी यांच्या मार्गदर्शनात एकता स्वयंसहायता महिला बचत गट तयार केले. त्यांच्या गटात एकूण १२ सभासद असून मासिक बचत ५० रूपये भरतात.या गटाला फिरता निधी १५ हजार रूपये मिळाला. त्यानंतर आयसीआयसीआय बँकेकडून एक लाख रूपयांचे कर्ज मिळाले. त्यातून पुष्पलता यांनी ३० हजार रूपयांचे कर्ज घेवून एक म्हैस खरेदी केली व दुग्ध व्यवसाय सुरू केला. दररोज ८ ते १० लिटर दूध ३० रूपये लिटरप्रमाणे विकून आपल्या तिन्ही मुलींना शाळेत शिकविले. पण एकच म्हैस असल्यामुळे पूर्ण वर्षभर रोजगार मिळत नव्हता.यानंतर गावातील सहेली ग्रामसंस्थेला मार्च २०१५ मध्ये सामुदायिक गुंतवणूक निधी मिळाला. तेव्हा सीआरपी व सहयोगिनी तसेच सीसी यांच्या मार्गदर्शनाने गटाला ७७ हजार रूपये सामुदायिक गुंतवणूक निधी मिळाला. त्यातून त्यांनी ४० हजार रूपये सीआयएफ घेवून उत्पन्नात वाढीसाठी एक म्हैस खरेदी केली. आज त्या १८ ते २० लिटर दूध विक्री करून ४०० रूपये रोज प्रमाणे उत्पन्न मिळवित आहेत. त्यातूनच आज त्यांच्याकडे चार म्हशी झाल्या. तसेच आयसीआयसीआय व सीआयएफ परतफेड दर महिन्याला करीत आहेत. महिला बचत गटामुळे आज आपल्या गरीब परिस्थितीची कायापालट झाल्याचे त्यांनी सांगितले.मोठी मुलगी झाली ‘पोलीस’सालेकसा तालुका स्थळापासून निंबा गाव चार किमी. अंतरावर आहे. गावची एकूण लोकसंख्या १५७५ असून कुटुंब संख्या ३२० आहे. गावात एकूण २५ बचत गट असून त्यापैकी एक अपंग गट आहे. येथील मुख्य व्यवसाय शेती असून शेळीपालन, कुक्कुटपालन, गाय व म्हशीपालन हे जोडव्यसाय केले जाते. तसेच हस्तकला व्यवसायात गाव प्रसिद्ध आहे. महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित जयसेवा लोक संचालित साधन केंद्र सालेकसाद्वारे सहेली ग्रामसंस्था स्थापित आहे. त्यांतर्गत एकता स्वयंसहायता महिला बचत गट निंबा येथे असून पुष्पलता कटरे सदस्य आहेत. तर भूमिता पटले सचिव आहेत. पुष्पलता यांनी म्हशीपालन व दुग्धव्यवसायातून आपल्या तिन्ही मुलींना शिक्षण दिले. यापैकी त्यांची मोठी मुलगी आता पोलीस झाली असून दुसरी मुलगी बीएससी प्रथम वर्षाला आहे तर तिसरी मुलगी दहावीचे शिक्षण घेत आहे.
दुग्ध व्यवसायातून ‘पुष्पलता’ने सावरली जीवनाची वेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 9:40 PM
अल्पशी शेती व रोजगार हमीचे काम यातून कुटुंबातील पाच जणांचा उदरनिर्वाह सांभाळणे कठिण जात होते. अशातच सालेकसा तालुक्यातील ग्राम निंबा येथील एकता स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सदस्य पुष्पलता टेकचंद कटरे यांनी गटातून कर्ज घेवून म्हशी खरेदी केल्या.
ठळक मुद्देएकता स्वयंसहायता महिला बचत गट : दूध विक्रीतून तिन्ही मुलींचे शिक्षण