लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील शासकीय जमिनीवर डोळा ठेवून काहींनी अतिक्रमण करण्याचा सपाटा लावला आहे. याला प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि कारवाईचा अभाव कारणीभूत आहे. परिणामी अतिक्रमणकर्त्यांकडून शहरातील शासकीय जमिनी गिळंकृत केल्या जात आहेत. असाच प्रकार सूर्याटोला येथे सुरू आहे. येथील बांध तलाव पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.
अतिक्रमणकर्त्यांनी तलाव खोदून त्याचे जमिनीत रूपांतर करण्याचा डाव आखून पाऊल टाकले आहे. हा प्रकार सुरू असूनही प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे बांध तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. शहरातील सूर्याटोला परिसरातील बांध तलाव नेहमीच अतिक्रमणकर्त्यांच्या रडारवर राहिला आहे. तलाव परिसरात यापूर्वीही अतिक्रमण करण्यात आले होते. परंतु, स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले. येथील रहिवासी असलेले सूर्यवंशी गुरुजी यांनी या अतिक्रमणाविरोधात आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अतिक्रमण काढून बांध तलावाचे सौंदर्गीकरण केले होते.
यामुळे बांध तलावाचे संरक्षण होऊन परिसराच्या सौंदर्यात भर पडली. या तलावामुळे परिसरातील पाणी पातळी टिकून राहण्यास मदत झाली. परंतु, पुन्हा बांध तलावाला ग्रहण लावण्याचे काम सुरू झाले आहे. येथील दोन रहिवाशांनी बांध तलावावर अतिक्रमण करणे सुरू केले. तलावात जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करून तलावाच्या पात्राचे सपाटीकरण केले जात आहे. यातून तलाव समतल होऊन जमिनीत रूपांतरित करण्याचा अतिक्रमणकर्त्यांचा डाव आहे. शिवाय या जमिनीवर शेती करण्याच्या उद्देशाने हालचाली सुरू आहेत. त्यामुळे बांध तलावाचे अस्तित्व पुन्हा धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष देऊन 'त्या' अतिक्रमणकर्त्यावर कारवाई करावी, अशी मागणी सूर्याटोला येथील नागरिकांकडून केली जात आहे.
प्रशासन लक्ष देणार का?सूर्याटोला येथील बांध तलावावर नेहमीच अतिक्रमणकर्त्यांचा डोळा राहिला आहे. प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नसल्याने अधूनमधून अतिक्रमणाचे प्रकार सुरूच राहतात. आता पुन्हा तलावात अतिक्रमण करून तलावाच्या सपाटीकरणाचे काम सुरू आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर बांध तलावही सूर्याटोलावा- सीयांच्या आठवणीपुरताच शिल्लक राहील असेच अतिक्रमणकर्त्यांच्या हालचालींवरून दिसत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारसूर्याटोला येथील गट क्र. ३३०/०१ मध्ये बांध तलाव आहे. हा तलाव आदर्श मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था, सूर्याटोलाला मासेमारी- करिता लीजवर दिला आहे. ही संस्था तलावावर मत्स्यबीज संचयन करून मत्स्यपालन व मत्स्यव्यवसाय करत आहे. परंतु, येथील दोन रहिवाशांनी तलावाच्या मधोमध जेसीबीच्या माध्यमातून सपाटीकरण करून शेती करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अतिक्र- मणाच्या या प्रकाराने तलाव धोक्यात आला आहे. आदर्श मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेकडून याची तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस निरीक्षक तसेच पं. स.च्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.