लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा व कोहळीपार शेतशिवारात अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बी धानाची लागवड केली आहे. शेतीला लागूनच जंगल असल्याने वन्य प्राण्यांचा सतत वावर असतो. त्यामुळे पिकांचे वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी अडचणीत आले आहे. तालुक्यातील कोहळीपार शिवारातील शेतकरी धनलाल मानवटकर, रवींद्र बावनकुळे, कुंडलिक मानवटकर, देवराम मानवटकर, कृष्णा बावनकुळे, संजय बावनकुळे, विजय मानवटकर, विनायक गोस्वामी, सदाराम बावनकुळे, भागवत पंधरे व अन्य शेतकऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी रब्बी धानाची लागवड केली होती. धानाला फुटवे फुटण्याअगोदरच रानगव्यांनी अंदाजे दहा एकरातील धानाची नासाडी करून शेतकऱ्यांचे नुकसान केले. यामुळे शेतकऱ्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. या परिसरातील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेतीवरच अवलंबून आहे. सर्वांकडे स्वत:ची सिंचनाची सोय असल्याने खरीप व रब्बी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खरीप हंगामात नैसर्गिक संकटामुळे धानाच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. मात्र यानंतरही शेतकऱ्यांनी खचून न जाता हिम्मत करून शेती केली; पण वन्यप्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे लेखी निवेदन क्षेत्र सहायक फिरोज खॉ पठाण यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.