गोंदिया : हळुवार का असेना मात्र कोरोना जिल्ह्यात आपले पाय पसरत असल्याचे दिसत आहे. कारण, जिल्हा नियंत्रणात असला तरीही शुक्रवारी (दि. १७) गोंदिया तालुक्यात तब्बल ३ बाधित निघाले आहेत. यामुळे आता धोका वाढताना दिसत असून, नागरिक मनमर्जीने वागताना दिसत आहेत. यावर मात करण्यासाठी आता खबरदारी व लस या दोनच गोष्टींची गरज आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही अंगाला थरकाप आणणारा आहे. त्यानंतर शासनाने नागरिकांना कोरोना नियमांचे पालन व लवकरात लवकर लसीकरण या दोनच गोष्टींवर भर देण्याचे आवाहन केले आहे. मात्र आता जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असल्याने नागरिकांनी नियम व लस या दोघांनाही बाजूला टाकले आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असून, गर्दी वाढतच चालली आहे. परिणामी धोकाही वाढत असून, शुक्रवारी (दि. १७) तालुक्यात तब्बल ३ बाधित निघाले आहेत. मागील २-३ महिन्यांतील ही सर्वाधिक आकडेवारी दिसून येत आहे.
त्यातही गोंदिया तालुका हॉटस्पॉट असून, येथेच सर्वाधिक बाधित व मृत्यूंची नोंद घेण्यात आली आहे. आता त्यात आणखी ३ बाधितांची भर म्हणजे, धोक्याची घंटाच वाटत आहे. अशात आतातरी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज असून, सध्या फक्त गोंदिया तालुकाच कोरोना बाधित दिसून येत आहे. यामुळे नागरिकांनी पुढचा धोका टाळण्यासाठी आतापासून नियमांचे पालन व लसीकरण याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
-----------------------------------
लसीकरणाची गती मंदावली
जिल्ह्यात मध्यंतरी दररोज १५,००० ते १६,००० नागरिकांचे दररोज लसीकरण होत होते. यामुळेच आता जिल्ह्याने ९,३१,५८० नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा गाठला असून, त्याची टक्केवारी ९० टक्के एवढी आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून दररोजची आकडेवारी ११,००० च्या आतच दिसून येत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करावयाचे असल्याने ही स्थिती व्यवस्थित नाही. करिता आता नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन सुरक्षित व्हायची गरज आहे.
-------------------------------
दुसरा डोस गरजेचा
जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याने कित्येकांनी आता कोरोना गे,ला असा संभ्रम पाळून लसीकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. एवढेच नव्हे तर फक्त २३ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यावरून नागरिकांनी आता कोरोना नसल्याने डोस घेण्याची गरजच काय, अशी समज बाळगल्याचे दिसते. मात्, दोन्ही डोस घेतल्याशिवाय सुरक्षा नाही. करिता लवकरात लवकर दुसरा डोस घेण्याची गरज आहे.