गोंदिया : राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याने धोका वाढला असतानाच जिल्ह्यात आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला आहे. यामुळे आता मृतांची आकडेवारी १८४ झाली आहे. त्यातच बुधवारी (दि. १७) जिल्ह्यात मात करणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या जास्त दिसून आली आहे. यात ७ बाधितांची भर पडली असून, ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात मध्यंतरी आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसत आहे. परिणामी, आता राज्य शासनाकडून पुन्हा काही निर्बंध लावण्यात येण्याचे संकेत मिळत आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात असतानाच पुन्हा धोका वाढत असल्याने जिल्हावासीयांनीही काळजी घेण्याची गरज आहे. कारण, कित्येक दिवसांच्या कालावधीनंतर जिल्ह्यात बुधवारी (दि. १७) आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर आता मृतांची संख्या १८४ झाली आहे. शिवाय, ७ नवीन बाधित आढळून आले असून, ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच, बाधितांची संख्या जास्त व मात करणारे कमी झाले असून, हे टेन्शन वाढविणारे आकडे आहेत यात शंका नाही.
बुधवारी जिल्ह्यात ७ बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील ६ व गोरेगाव तालुक्यातील १ रुग्ण आहे. तर मात करणाऱ्या ५ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ४ व आमगाव तालुक्यातील १ रुग्ण आहे. यानंतर आता जिल्ह्यातील बाधितांची आकडेवारी १४,३०६ एवढी झाली असून १४,०६४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आता ५८ रुग्ण क्रियाशील उरले आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४७, तिरोडा ३, गोरेगाव २, आमगाव १, सालेकसा २, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १ तर इतर राज्य व जिल्ह्यातील २ रुग्ण आहेत.
-----------------------
आतापर्यंत १८४ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात बुधवारचा आकडा घेऊन आतापर्यंत १८४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील १०२, तिरोडा २४, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ११ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १० रुग्ण आहेत. आता बाधितांची संख्या वाढत असतानाच मृतांचा आकडाही वाढल्याने टेन्शन वाढणार आहे.
---------------------------------
आतापर्यंत १,३५,७०५ चाचण्या
जिल्ह्यात आतापर्यंत १,३५,७०५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ६८,३५७ आरटी-पीसीआर चाचण्या असून त्यात ८,४४६ पॉझिटिव्ह तर ५६,६५७ निगेटिव्ह आहेत. तसेच ६७,३४८ रॅपिड अँटिजेन चाचण्या असून त्यातील ६,१५४ पॉझिटिव्ह तर ६१,१९४ निगेटिव्ह आहेत.