गोंदिया : राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा फोफावत असून यामध्ये शेजारच्या भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे. ही बाब लक्षात घेत खुद्द केंद्रीय समितीने सतर्कतेचा इशारा दिला असतानाच आता आरोग्य विभागाने खरबदारीच्या सूचना दिल्या आहेत. आता जिल्हावासीयांनाही जपूनच रहावे लागणार असून कोरोनाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी अनिवार्य झाली आहे.
जिल्ह्यात सध्या बोटावर मोजण्याइतके नवे रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हावासीयांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. परिणामी जिल्ह्यातील क्रियाशील रुग्णांची संख्या खाली आली आहे. असे असतानाच मात्र, राज्यातील ९ जिल्ह्यात कोरोना पुन्हा फोफावताना दिसत असून यामुळे स्थिती गंभीर झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा हा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय समितीने अवघ्या विदर्भालाच सतर्कतेचा इशारा दिला होता. तर आता आरोग्य विभागाने कोरोनाची ही स्थिती बघता खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. एकंदर ही स्थिती बघता कोरोना पुन्हा फोफावत असल्याचे स्पष्ट होत आहे. अशात जिल्ह्यात सध्या नियंत्रणात असलेली कोरोनाची स्थिती बघता जिल्हावासीयांनी अतिरेक न करता कोरोना विषयक उपाययोजनांचा अंमल करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात कमी प्रमाणात का असो ना मात्र रुग्ण संख्या वाढतीच आहे. म्हणजेच. कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. तर शेजारच्या भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने ‘जिल्हावासीयांनो आता जरा जपून’ असे बोलण्याची गरज निर्माण झाली आहे.
-------------------------
गोंदिया व तिरोडा तालुका हॉटस्पॉट
जिल्ह्यातील गोरेगाव, सालेकसा, देवरी व सडक-अर्जुनी हे ४ तालुके ग्रीन झाले असून आमगाव व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात प्रत्येकी १ रूग्ण असल्याने हे २ तालुके ग्रीन होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र सुरुवातीपासूनच कोरोना हॉटस्पॉट असलेले गोंदिया व तिरोडा हे तालुका आजही सावरलेले नाहीत. गोंदिया तालुक्यात आजही ५६ रुग्ण असून तिरोडा तालुक्यात १३ रुग्ण आहेत. शिवाय, दररोजच्या आकडेवारीत या तालुक्यांत रुग्ण निघत असल्याने दोन्ही तालुक्यात जास्त खबरदारीची गरज दिसून येत आहे.