मालगाडीच्या मधून जातात प्रवासी : लिफ्टच्या कामामुळे प्रवाशांना अर्धा किलोमीटरची पायपीट गोंदिया : लिफ्ट व एस्कलेटरच्या कामामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावर ये-जा करण्यासाठी सोईस्कर असलेले पूल बंद करण्यात आले आहे. आता प्लॅटफॉर्म-३, ४, ५ व ६ वरून स्थानकाबाहेर पडण्यासाठी किंवा सदर फलाटांवर जाण्यासाठी प्रवाशांना मुख्य प्रवेशद्वारातून जावून मालवाहू रस्त्याचा वापर करावा लागत आहे. मात्र या मालवाहू रस्त्यावर मालगाड्या उभ्या राहात असल्याने प्रवासी जीव धोक्यात घालून मालगाडीच्या दोन डब्यांच्या मधून रेल्वे रूळ पार करतात. हा प्रकार गोंदिया स्थानकावर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा ठरत आहे. मागील सहा महिन्यांपासून गोंदिया रेल्वे स्थानकावर लिफ्ट व एस्कलेटरचे काम सुरू आहे. त्यासाठी पूर्वीचा पूल तोडण्यात आला. त्यामुळे आता स्थानकाच्या प्रवेशदारातून होमप्लॅटफार्मवरून मालवाहू रस्त्याने प्लॅटफॉर्म-३, ४, ५ व ६ वर प्रवाशांना जावे लागते. तसेच याच मालवाहू रस्त्यावरून स्थानकाबाहेर पडण्यासाठी जावे लागते. मात्र अनेकदा मालवाहू रस्त्यावर मध्यंतरीच मालगाडी उभी केली जाते. त्यामुळे काही प्रवासी लवकर जाण्याच्या भानगडीत मालगाडीच्या खालून किंवा दोन बोगीमधील रिकाम्या जागेतून जाण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी मालगाडी सुरू झाली तर निश्चितच जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत रेल्वे स्थानकाच्या विविध फलाटांवर ये-जा करण्यासाठी दुसरे कोणतेही मार्ग उपलब्ध नाही. केवळ मालवाहू रस्ता हाच एकमेव रस्ता आहे. तो पार करण्यासाठीही नागपूरकडून आलेल्या प्रवाशांना स्टेशनच्या बाहेर निघेपर्यंत अर्धा किलोमीटरचा फेरा पडतो. गोंदिया स्थानक हे जंक्शन असून नागपूर, रायपूर, बालाघाट व चंद्रपूर अशा चारही दिशांनी प्रवाशी गाड्या धावतात. त्यामुळे या स्थानकावर प्रवाशांची मोठीच वर्दळ असते. अशात स्थानकाच्या फलाटांवर ये-जा करण्यासाठी एकमेव पर्यायी मार्ग म्हणून मालवाहू रस्ताच आहे. त्यामुळे या मार्गावर मालगाड्या उभ्या करण्यात येवू नये, अशी प्रवाशांची मागणी आहे. मालवाहू रस्त्यासमोरील प्रवेशद्वार बंदच स्वयंचलित पायऱ्यांच्या कामासाठी पूल तोडण्यात आले. तर आता प्रवाशांना ये-जासाठी सोईस्कर असलेले मालवाहू रस्त्याच्या समोरील प्रवेशद्वार बंदच ठेवले जाते. वास्तविक अनेक दिवसपर्यंत या फाटकातून नागरिक थेट स्थानकाच्या बाहेर मार्केटमध्ये पोहोचत होते. आता प्लॅटफॉर्म-५, ६ व ७ वरील प्रवाशांना स्थानकाबाहेर पडण्यासाठी मोठीच कसरत करावी लागते. त्यांना स्थानकाबाहेर पडण्यासाठी तब्बल अर्धा ते पाऊन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून मालवाहू रस्त्यासमोरील प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात यावे, अशी रेल्वे प्रवाशांची मागणी आहे. मालगाडीच्या खालून जाणारे तिघे जखमी, दोघे गंभीर गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीच्या खालून दुसरीकडे जाणाच्या प्रयत्नात तीन व्यक्ती जखमी झाले. यापैकी दोघांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. ही घटना बुधवारी (दि.५) पहाटे ५.२५ वाजता रेल्वे स्थानकाच्या लाईन क्रमांक ४ वर घडली. जखमींमध्ये अशोक गणेश डोंगरे (४५) रा. कुडवा, अशोक ढोणे रा.चिचगाव व गुलाब नामक व्यक्ती या तिघांचा समावेश आहे. त्यांना गोंदिया मेडीकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अशोक ढोणे यांची प्रकृती ठिक झाल्यावर ते आपल्या घरी गेले. मात्र अशोक डोंगरे व गुलाब यांची प्रकृती गंभीर आहे. दोघांपैकी एकाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावर एक मालगाडी उभी होती. या दरम्यान अनेक लोक त्या मालगाडीच्या खालून पलिकडे जाण्यासाठी निघत होते. यात काही जण दुसरीकडे जाण्यात यशस्वी ठरले, मात्र तीन जण गाडीखाली असतानाच गाडी सुरू झाली. तिथे उपस्थित लोकांनी त्या तिघांना बाहेर काढून रूग्णालयात पोहोचविले. गोंदिया रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक तिवारी यांना सायंकाळी बयान घेण्यासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले. परंतु जखमी बेशुद्ध असल्यामुळे त्यांचे बयान होऊ शकले नाही.
गोंदिया स्थानकावर प्रवाशांचा जीव धोक्यात
By admin | Published: April 06, 2017 12:51 AM