महिलेची चेन हिसकावली : मॉर्निंगवॉकवाले झाले असुरक्षित लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आरोग्यासाठी मॉर्निगवॉक चांगला असून डॉक्टरही तसा सल्ला देतात. मात्र येथील हड्डीटोली रिंगरोडवर जाणाऱ्यांना त्यांचा मॉर्निगवॉक धोकादायक ठरत आहे. कारण रविवारी (दि.२) पहाटे महिलेवर काठीने हल्ला करून तिच्या गळ््यातील सोन्याची चेन दोघांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे हड्डीटोली रिंगरोड आता धोकादायक बनला असून पोलिसांनी यावर कठोर पाऊल उचलण्याची मागणी केली जात आहे. सकाळी फिरायला जाण्याची ज्यांची दिनचर्या आहे ते कोणताही ऋतू असो आपली दिनचर्या बदलत नाही. सध्या गोंधळापासून दूर शांत वातावरणात फिरायला जाणे लोक पसंत करीत असून त्यामुळेच मामा चौकातून पुढे जात असलेल्या हड्डीटोली रिंगरोडवर सकाळी व सायंकाळी फिरायला जाणाऱ्यांची गर्दी असते. यात महिला व पुरूषांचाही समावेश असून पहाटेपासूनच या रस्त्यावर फिरण्यासाठी लोक येतात. मात्र शहराच्या गर्दीपासून दूर असलेला हा रस्ता असामाजीक तत्वांसाठी फायद्याचा ठरत आहे. यातूनच येथे अवैध धंदेही चालतात व कित्येकदा अनुचीत प्रकारही येथे घडले आहेत. त्यात रविवारी (दि.२) पहाटे ४.४५ वाजता दरम्यान प्रोग्रेसिव्ह स्कूलचे संचालक निरज कटकवार यांच्या आई फिरायला गेल्या असता शुकशुकाट असल्याने दोन अनोळखी तरूणांनी त्यांच्या डोक्यावर व हातावर काठीने मारून गळ््यातील सुमारे तीन तोळ््यांची सोन्याची चेन हिसकावून नेली. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या दोन मैत्रिणींचे केस ओढले व पळून गेले. या घटनेत चेन हिसकावून नेले ती बाब वेगळी, मात्र त्या महिलेचा जीवावर बेतली नाही हे विशेष. विशेष म्हणजे या रिंगरोडवर महिला व तरूणी सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी जातात. शिवाय येथूनच परिसरातील महिला व विविध शाळा असल्याने त्यातील शिक्षिकांचीही सततची ये-जा असते. अशात आता त्या किती सुरक्षीत आहेत याचा अंदाज लावता येतो.विवेकानंद कॉलनीत घरफोड्यांचे सत्र या रिंगरोडला लागूनच विवेकानंद कॉलनी आहे. या कॉलनीत मोठ्या प्रमाणात घरफोडीचे प्रकार घडतात. कॉलनीतून निघाल्यावर रिंगरोडवरून बाहेरच्याबाहेर चोरट्यांना पळण्याचा रस्ता मिळतो. विशेष म्हणजे, कॉलनीत कित्येकदा भरदिवसा घरफोड्यांचे प्रकार घडले आहेत. यामुळे कॉलनीवासीही नेहमी दहशतीत वावरतात. या प्रकारांवर आळा घालता यावा यासाठी पोलिसांनी सतत गस्त करावी अशी कॉलनीवासीयांची मागणी आहे. मामा चौकात पोलीस चौकीची मागणी शहरातील मामा चौक आजघडीला सर्वात वर्दळीचे चौक बनले आहे. चौकात सकाळपासून रात्री उशीरापर्यंत मुलांची गर्दी असते. चौकातील दुकान व हॉटेल समोर वाहन लावून मुले उभी राहतात. कित्येकदा येथे टवाळखोरीचे प्रकार घडतात. गर्दीमुळे चौकातून ये-जा करणे कठीण होत असून महिला व तरूणींना चौकातून जाणे कठीण झाले आहे. तसेच चौकात कित्येकदा भांडण तंटे ही होतात. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मामा चौकात पोलीस चौकी उघडून चौक गर्दीपासून मोकळा करण्याची मागणी केली जात आहे.
हड्डीटोली रिंगरोड ठरतोय धोकादायक
By admin | Published: July 03, 2017 1:25 AM