अपघाताला देतात आमंत्रण : कारवाई करण्याची नागरिकांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क सौंदड : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोठ्या प्रमाणात जड वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जात आहेत. या वाहनांमुळे मात्र अपघातांचे प्रमाण वाढले असून रस्त्यावर उभी वाहने अपघातांना आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे. उल्लेखनिय असे की, राष्ट्रीय महामार्ग क्र.६ चौपदरी महामार्ग आहे. या मार्गाने चेन्नई, मुंबई सारख्या ठिकाणाहून वाहणे मोठ्या प्रमाणात वाहतूक करतात. लांबून येणारे वाहनधारक जेवणासाठी महामार्गावरील ढाब्यावर थांबतात. रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून ढाब्यावरच आंघोळ, जेवण व झोप काढून पुढे निघतात. मात्र धाब्याच्या समोर उभे वाहन हे अपघातांना आमंत्रण देणारे ठरत आहे. या उभ्या वाहनांमुळे आजुबाजुने येणारे वाहन दिसून येत नाहीत. तर रात्रीच्या वेळी कित्येकदा अपघातही होतात. या वाहनांचा त्रास गावातील जनतेलाही होत आहे. गावामध्ये शिरण्याकरिता कित्येक वेळा उभ्या वाहनांमुळे मार्ग शोधणे कठीण होते. महामार्गावरील दुकाने याला मुख्य कारणीभूत असून जनतेला मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर या उभ्या वाहनांच्या माध्यमातून अवैध व्यवसाय ही चालवले जातात. सिमेंट, लोहा, केरोसीन, डिझेल, पेट्रोल, अॅलमोनियम सारखे साहित्य खरेदी व विक्री केली जाते. अवैध व्यवसायाला ढाब्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे.
महामार्गावर उभी वाहने धोकादायक
By admin | Published: May 06, 2017 12:58 AM