गोंदिया : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेलगत असलेल्या गोंदिया तालुक्यातील चंगेरा परिसरातून मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी केली जाते. यापूर्वीदेखील या परिसरातून जनावरांची तस्करी करणाऱ्यांना पकडण्यात आले. मात्र जनावरांची तस्करी करताना मृत्युमुखी पडलेली जनावरे चंगेरा परिसरातील शासकीय जागेवर उघड्यावर फेकली जात असल्याचा प्रकार सोमवारी (दि.२१) उघडकीस आला.
प्राप्त माहितीनुसार चंगेरा येथील सरपंच, पोलीसपाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष आणि तलाठी व दोन पंच या चंगेरा परिसरातील एका शासकीय जमिनीची मोजणी आणि प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान ज्या जागेची माेजणी करण्यासाठी गेले होते त्याच शासकीय जागे लगत पाच ते सहा मृत जनावरे पडून असलेली आढळली. तसेच जनावरांचे मांस आणि चमडे पडलेले आढळले. सरपंच लालसिंग पंधरे यांनी याची पंचनाम्यात नोंद करण्याची सूचना तलाठ्याला केली. पण त्यांनी नोंद करणे टाळून याप्रकाराकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. मात्र हा प्रकार गंभीर असून, यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य सुद्धा धोक्यात येऊ शकते. शिवाय जनावरांची तस्करी करणाऱ्यांची हिम्मत वाढू शकते. त्यामुळे याची तक्रार त्यांनी उपविभागीय अधिकारी आणि पोलीस स्टेशनकडे करणार असल्याचे पंधरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा सरपंच पंधरे यांनी केली आहे.