नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिवंत रूग्णांना हवा तसा उपचार मिळत नाही. परंतु मृतदेहाला यातना सोसाव्या लागतात. इतकेच नव्हे तर मृतदेहाला पैसे मोजल्याशिवाय शवगृहातून सुटका होत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त येणाऱ्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांची मोठी हेळसांड होत आहे. वैद्यकीय अधिष्ठाता याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असून माझे कुणी ऐकत नाही हा एकच शब्द रेटत असतात.जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. परंतु येथील रूग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात जे रूग्ण दाखल होतात त्यांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले जाते. उपचारादरम्यान मृत पावलेल्या मृतदेहाची उत्तरीय तपासणीसाठी मृतदेहाला शवगृहात टाकले तर त्यालाही पैसे मोजावे लागतात. उत्तरीय तपासणीनंतर त्या मृतदेहाचा व्हिसेरा व त्याला लागणारा कापड हे शासनाकडून पुरविला जाते. परंतु त्या साहित्याची माहिती न देता मृताच्या नातेवाईकांना कापड व व्हिसेरा ठेवण्याच्या डब्यासाठी ८०० ते १ हजार रूपयापर्यंतची मागणी केली जाते. अत्यंत अडचणीत असलेल्या लोकांना ऐनवेळी धारेवर पकडून त्यांच्याकडून हजारो रुपये वसूल केले जातात.परंतु मृतदेह घरी नेण्याची घाई असलेले मृताचे नातेवाईक एक हजार रूपयाच्या साहित्यासाठी वादही घालू शकत नाही. ही विदारक स्थिती गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात आहे. या वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे येथे येणाºया रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. रुग्णांना औषधे तसेच योग्य उपचार मिळत नसल्याची ओरड आहे. येथील आरोग्य सेवेसंदर्भात असो किंवा अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र असो यासंदर्भात नेहमी टाळाटाळीची उत्तरे केटीएस व वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी एकमेकांवर हे काम आमचे नाही, म्हणून ढकलण्याचे काम करतात. रुग्णांना बाहेरुन औषधे घेण्याचा सल्ला दिला जात आहे.रुग्णालयाच्या परिसरात अस्वच्छता जिल्हा रुग्णालयात येणाºया रुग्णांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून सुरक्षा भिंतीलगत नळ लावण्यात आला आहे. मात्र नळ असलेल्या परिसरात अस्वच्छता आहे. त्यामुळे येथे येणाºया रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रूग्णालयातच रूग्णांना मरण यातना भोगाव्या लागत आहे.शस्त्रक्रियेसाठी लागतो ‘जॅक’गोंदियात वैद्यकीय महाविद्यालय आल्यानंतर बीजीडब्ल्यू व केटीएस येथील कारभार अधिष्ठाता यांच्या हातात गेला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रूग्णांची शस्त्रक्रिया या वैद्यकीय महाविद्यालयात करण्यासाठी नातेवाईकांनी रूग्णाला आणल्यावर त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. एखादे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार किंवा बड्या अधिकाऱ्यांचा फोन त्या डॉक्टरांना आल्याशिवाय रूग्णांची शस्त्रक्रियाच होत नाही. गरीब रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी ‘वशीला’ (जॅक) लावावा लागतो. येथील रूग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी साहित्य उपलब्ध नसल्यामुळे शस्त्रक्रियेस उशीर होत असल्याची ओरड डॉक्टरांची असते.
मृतदेह नेण्यासाठी येथे लागते स्पर्धागोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर त्याचा मृतदेह त्याच्या घरी पोहचविण्यासाठी माझी रूग्णवाहीका लागावी,यासाठी जणू स्पर्धा लागली असते. माझी रूग्णवाहिका लागावी यासाठी ते प्रयत्न करून कोणता रूग्ण मरतो याकडे त्यांच्या नजरा लागलेल्या असतात. मृतदेह वाहून नेतांना दिवसभराच्या गाडीचा भाडा व कमाई त्यातून होऊन जाते. परिणामी मृतदेहाला वाहून नेण्यासाठी रूग्णवाहिकांची स्पर्धा या ठिकाणी आहे.मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर त्या मृतदेहाला लागणारे कापड किंवा व्हिसेरा करीता लागणारे डबे मेडीकल कॉलेजकडे उपलब्ध आहेत. कुणीही कापड किंवा मृतदेहाच्या कापडाच्या नावावर लोकांकडून पैसे मागत असतील तर ते देऊ नयेत. शिवाय याची रितसर तक्रार करावी.-डॉ. पी.व्ही.रूखमोडे, वैद्यकीय अधिष्ठाता गोंदिया.