घातपाताचा संशय : आरोपीच्या अटकेनंतर तणाव निवळलाआमगाव : अवैध उत्खनन करणाऱ्यांच्या दहशतीपुढे तालुका प्रशासन हतबल झाल्याने चोरटी वाहतूक करणाऱ्यांची हिंमत वाढली आहे. यातूनच सोमवारी एका इसमाचा अवैधपणे मुरूम नेणाऱ्या ट्रॅक्टरखाली येऊन मृत्यू झाला. हा अपघात नसून त्याची हत्याचा केल्याचा संशय व्यक्त करीत कुटुंबीयांसह नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र संशयित आरोपीला अटक केल्याने तणाव निवळला.रिसामा शिवारात ५ आॅक्टोबरला सायंकाळी काही लोक ट्रॅक्टरने अवैधपणे मुरूमाचे उत्खनन करुन तो ट्रॅक्टरमध्ये भरत होते. याचवेळी रिसामा येथील योगेश डुलीचंद येटरे (३५) यांनी ट्रॅक्टरवर चढून तो ट्रॅक्टर चालविणाचा प्रयत्न केला. परंतु ट्रॅक्टर काही अंतरावर जाऊन अपघातग्रस्त झाला. यात योगेशचा जागीच मृत्यू झाला. परंतु सदर अपघात नसून अवैध उत्खनन करणाऱ्यांनी मृतकाचा घात करुन त्याला ठार मारल्याचा आरोप करीत कुटुंबीयांनी दोषींना अटक करण्याची मागणी केली. एवढेच नाही तर संबंधित आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह घेऊन तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला. त्यामुळे आमगाव शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस विभागाने शहरातील प्रमुख मार्गावर चोख बंदोबस्त लाऊन मृतकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात ठेवला. दरम्यान या प्रकरणावरून नागरिकांमध्ये असंतोष पसरत असताना प्रशासनाने योग्य खबरदारी घेत आरोपीला अटक केली. त्याच्याविरूद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन नायब तहसीलदार वाघचोरे यांनी मृतकाच्या कुटुंबीयांना दिले. त्यामुळे कुटुुंबियांनी आंदोलन मागे घेतले.या प्रकरणातील ट्रॅक्टर (एमएच ५३, एफ १९४६), ट्रॉली (एमएच २६/१०१३) जप्त करून आरोपी विनोद श्रीराम कोरे (२८ वर्ष) याच्याविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ अ, सहकलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंद करुन त्याला अटक करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
अवैध मुरूम नेताना ट्रॅक्टर उलटून एक ठार
By admin | Published: October 07, 2015 12:21 AM