सुरेश येडे
रावणवाडी : रब्बी हंगामातील पैसे न मिळाल्यामुळे आता खरिपातील पिकांसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. अशात आता शेतकरी शेतात उभ्या पिकांचा खासगी धान व्यापाऱ्यांसोबत सौदा करीत आहेत. यात मात्र धान व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत असून शेतकऱ्यांकडून साता-बारा तसेच दिलेल्या पैशांवर ५ टक्के दराने व्याज घेत आहेत.
येत्या ४ महिन्यांनी खरिपाचे धान येणार असताना शेतकऱ्यांकडे खरिपातील पिकांसाठी पैसा नसल्याने ते आतापासूनच शेतात उभ्या धानाचा सौदा १४०० रुपयांत खासगी धान व्यापाऱ्यांसोबत करीत आहेत. शेतकऱ्यांच्या या अडचणीचा फायदा धान व्यापारी घेत असून शेतकऱ्यांकडून ५ टक्के व्याज तसेच बँक पासबुक, सातबारा व आधारकार्ड घेत आहेत. तालुक्यातील ग्राम रावणवाडी, चारगाव, गर्रा, मुरपार आदी गावांमध्ये हे चित्र बघावयास मिळत आहे. शेतकऱ्यांनी आधारभूत शासकीय धान केंद्रांवर रब्बीतील पीक विकून ३ महिने झाले आहेत. मात्र त्याचा पैसा हाती न आल्याने धान व्यापारी याचा फायदा घेत आहेत. येथे धान व्यापारी शेतकऱ्यांचा सात-बारा घेत असून, जेणेकरून ते आपले धान शासकीय केंद्रांवर विकून फायदा घेतील. शेतकऱ्यांना ४ महिन्यांनी धान विकताना व्यापाऱ्यांना ५ टक्के दराने घेतलेल्या पैशांवर व्याज द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या या लुटीवर वेळीच कारवाई करून आळा घालण्याची गरज आहे.
--------------------------------
पैसे नसल्याने व्यापाऱ्यांच्या दारी
रब्बीतील धानाचे पैसे वेळीच हाती आले असते तर खरिपात त्रास झाला नसता. मात्र पैसे नसल्यामुळे धान व्यापाऱ्यांकडून कर्ज घेऊन इच्छा नसताना सुद्धा उभ्या पिकांचा सौदा करावा लागत आहे.
- यशवंत लिल्हारे (शेतकरी, मुरपार)
------------------------------
चुकीच्या धोरणांचा शेतकरी बळी
वेळीच पैसे मिळाले असते तर आम्हाला खरिपात येणाऱ्या पिकांना ५०० रुपये कमी दराने विकण्याची गरज पडली नसती. आमच्या अडचणीचा फायदा व्यापारी घेत असून, शेतकरी चुकीच्या धोरणांचा बळी ठरत आहे.
- राजेश हरिणखेडे (शेतकरी, चारगाव)
---------------------