गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन प्लांट त्वरित सुरू करण्याचा परवाना मिळावा यासाठी रुग्ण सेवेचा हेतू समोर ठेवून अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांनी स्वत:च्या खिशातून पैसे देऊन मानवतेचा परिचय करून दिला.
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने रुग्णांना सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाची दाणादाण उडाली. रुग्णांना बेड कमी पडले, ऑक्सिजन संपत होते. एक वेळ बेड मिळाले नाही तरी चालेल. परंतु, ऑक्सिजनशिवाय एक क्षणसुध्दा मनुष्य काढू शकत नाही. गोंदिया जिल्ह्यातील कोविड रुग्णांना ऑक्सिजन मिळावे यासाठी राज्य सरकार, जिल्हा प्रशासन व अनेक लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न केले. परंतु, ऑक्सिजन प्लांटकरिता लागणारे लायसन्स मिळविण्यासाठी शासनाच्या खात्यातून पेट्रोलियम ॲण्ड एक्सोसीव्ह डिपार्टमेंट मुंबईला पैसे पाठविता आले नाहीत. त्या कंपनीला सरकारच्या खात्यातून नेफ्ट किंवा आरटीजीएस करण्याची गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयाची तयारी होती. परंतु, त्या कंपनीला नेफ्ट किंवा आरटीजीएस हे दोन्ही प्रकार चालत नसल्यामुळे रुग्णांसाठी ऑक्सिजनची सोय त्वरित करण्यासाठी कुठलेही काम थांबू नये, यासाठी अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांनी आपल्या खात्यातील ७५ हजार ८८५ रुपये पेट्रोलियम ॲण्ड एक्सोसीव्ह डिपार्टमेंट मुंबईला ट्रान्सफर करून रुग्णांच्या सेवेसाठी आपण किती तत्पर आहोत, हे दाखवून दिले. २९ एप्रिल रोजीच या ऑक्सिजन प्लांटचे कागदपत्रे जमा करण्यात आले. वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांनी उचललेल्या पावलांचे कौतुक जिल्हाधिकारी दीपककुमार मीना, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले आहे.