गोंदिया :न्यायालयाने ठोठावलेले दंडाचे पैसे वाचविण्यासाठी जिवंत व्यक्तीला मृत दाखवून त्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करण्यात आले. मात्र मृत दाखविण्यात आलेल्या त्या व्यक्तीलाच पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. सिनेस्टाईल घडलेल्या या प्रकरणात न्यायालयाने दोघांना शुक्रवारी (दि. २६) आपला निर्णय सुनावत कारावासाची शिक्षा सुनावली आहे. प्रवीण सुभाष गभणे (३०, रा. राठी हनुमाननगर, तुमसर) व श्रीकांत भय्यालाल मोरघरे (४४, रा. शास्त्रीनगर, तुमसर) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
२ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रबंधक जिल्हा न्यायालयातर्फे पोलिस कर्मचारी मेथीलाल ब्रिजलाल भंडारी (४८) यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, १३ जून २०१७ रोजी प्रबंधक जिल्हा न्यायालयात क्रिमिनल अपील क्रमांक १२-२०१५ मध्ये श्रीकांत भय्यालाल मोरघरे विरुद्ध महाराष्ट्र शासन यामध्ये १४ ऑगस्ट २०१७ रोजी अंतिम निर्णय निशाणी क्रमांक १९ प्रमाणे आरोपी प्रवीण गभणे, आरोपी श्रीकांत मोरघरे यांना १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात प्रबंधक जिल्हा न्यायालय यांच्याविरुद्ध आरोपी प्रवीण गभणे याने अपील केले होते. मात्र अपिलासाठी आरोपी श्रीकांत मोरघरे हा गैरहजर होता. त्यावर आरोपी प्रवीण गभणे याने आरोपी श्रीकांत मोरघरे याचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले. मात्र श्रीकांत हा जिवंत असल्याने पोलिसांनी त्यालाच न्यायालयात हजर केले. आरोपी प्रवीण गभणे याने खोटे मृत्यू प्रमाणपत्र दाखल करून न्यायालयाची दिशाभूल व फसवणूक केल्यामुळे या प्रकरणात दोघांवर अपराध क्रमांक - ५५५-२०१७ कलम ४२०, ४६८ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणावर शुक्रवारी (दि. २६) सुनावणी करण्यात आली.
अशी सुनावली शिक्षा- मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपी प्रवीण गभणे व श्रीकांत माेरघरे यांना पाच वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विवेक नार्वेकर यांनी केला होता, तर युक्तिवाद सहायक सरकारी अभियोक्ता कमलेश दिवेवार यांनी केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस हवालदार ओमराज जामकाटे, शिपाई रामलाल किरसान यांनी सहकार्य केले. उत्कृष्ट तपासाबाबत पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर व पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी त्यांचे कौतुक केले.