लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील दहेगाव जंगलातील गोंदिया-आमगाव मुख्य मार्गावर अज्ञात वाहनाने चितळाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.आमगाव तालुक्यातील दहेगाव जंगलात अनेक वन्यप्राणी असून याच जंगलातून गोंदिया आमगाव मार्ग जातो. या मार्गावर नेहमीच वाहनाची वर्दळ असते. वाढत्या तापमानामुळे जंगलातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करतात. या क्षेत्रातील वन्यजीव पाण्याचा शोधात मुख्य मार्गापर्यंत येतात.मंगळवारी रात्रीच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या एका चितळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाले. स्थानिक लोकांनी वन विभागाला माहिती दिली असता वनपरिक्षेत्र अधिकारी पी.बी.चन्ने घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळी पंचनामा करून चितळाचे शवविच्छेदन करण्यात आले. वन्य प्राणी समितीच्या सदस्यांच्या समोर त्याला अग्नी देण्यात आली.यावर्षी या जंगल परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेने ५ वन्यप्राण्याचा मृत्यू झाला आहे. मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूने जंगल परिसर असल्यामुळे वन्यजीव रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेने मृत्यूमुखी पडतात. वनविभागाने रस्त्याचा दोन्ही बाजूला जाळी लावावी व रस्त्यावर ब्रेकर (गति नियंत्रक रोधक) असले पाहिजे अशी मागणी वन्य प्राणी समितीने केली आहे. रस्त्याचा कडेला सूचना फलक नाहीत ते सुद्धा असले पाहिजे.वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले की विद्युत रोषणाई व जाळी करिता ६ महिन्यापूर्वीच निवेदन देण्यात आले. मात्र यावर अद्यापही कुठलीच कारवाही झाली नाही.
अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 9:03 PM