गोंदिया : कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला असून मागील आठवडाभरापासून कोरोनाबाधितांच्या मृत्यूला ब्रेक लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने घट होत असल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. ८) जिल्ह्यात २०३४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी १४५३ स्वॅब नमुन्यांची आरटीपीसीआर तर ५८१ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात पाच नमुने कोरोनाबाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.२२ टक्के आहे. गुरुवारी चार बाधितांनी कोरोनावर मात केली तर ५ नवीन रुग्णांची भर पडली. जून महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने ओसरली, तर जुलै महिन्यात सुद्धा हेच चित्र कायम आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३३ वर आली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत २,०३,०६९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १,७७,८२४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत २,१९,४२८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी १,९८,३५१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,१६२ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी ४०,४२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ३३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १५७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
................
लसीकरणाची ५ लाखांकडे वाटचाल
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. याअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ४,८१,०१३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात ३,८४,७४५ नागरिकांना पहिला डोस तर ९६,२६८ नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
.......................
लसींच्या तुटवड्यामुळे लांबले गर्भवती महिलांचे लसीकरण
गर्भवती महिलांनासुद्धा कोरोना प्रतिबंधात्मक लस घेता येत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या मोहिमेचा गोंदिया येथे गुरुवारी शुभारंभ करण्यात येणार होता. याकरिता आरोग्य संचालिका अर्चना पाटील या गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांच्याच हस्ते या मोहिमेची सुरुवात केली जाणार होती. मात्र, लसींचा साठा बुधवारी संपल्यानेच ही मोहीम गुरुवारपासून सुरू करता आली नाही.
..............