अर्जुनी मोरगाव : धान चोरी प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. मात्र, प्रकरणात वापरण्यात आलेले ट्रॅक्टर व सहआरोपींना अटक करण्यात आली नाही. पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करीत मोरगाव येथील शेतकऱ्याने सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
मोरगाव येथील महादेव किसन राऊत यांची मोरगाव येथे गट क्रमांक ३६६ मध्ये शेती आहे. त्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली होती. १९ मेच्या रात्री त्यांचे धानाच्या कडपा चोरून आरोपींनी नीलज गावात नेल्याची तक्रार २० मे रोजी त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी वेळीच या तक्रारीचे निवारण केले नाही. प्रथम खबर अहवालात ४ जून रोजी माहिती मिळाल्याची नोंद आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रभू जनार्धन मस्के व माणिक जनार्धन मस्के यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३७९, ४४७, ३४ कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली. तब्बल १५ दिवसांनंतर गुन्हा नोंदविण्यात आला. दिलेल्या तक्रारीवरून सहा. पोलीस निरीक्षक कदम हे मोक्यावर गेले. त्या ठिकाणी मळणी केलेले एक ट्रॅक्टर धान, धान चुरण्याची मशीन व ९ ते १० मजूर हजर होते. असे असतानाही पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. पोलिसांनी दोन आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदविला. मात्र, या गुन्ह्यामध्ये धानाच्या कडपा बांधण्यासाठी मदत करणारे मजूर, ज्या ट्रॅक्टर ट्रालीने धानाच्या गठ्ठ्यांची वाहतूक करण्यात आली ते वाहन, धान चुरण्याची मशीन व ज्यांनी धानाचे गठ्ठे बांधले त्या मजुरांना सहआरोपी बनविले नाही. ट्रॅक्टर, ट्राली व धान चुरण्याची मशीन जप्त केली नाही, असा महादेव राऊत यांनी आरोप केला आहे. त्यांनी याविरोधात सोमवारपासून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
===Photopath===
220621\20210622_140202.jpg
===Caption===
तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपोषणाला बसलेले महादेव राऊत