सडक अर्जुनी :
तालुक्यातील सहवनक्षेत्र कार्यालय कोहमारा अंतर्गत येणाऱ्या देवपायली- मोगरा रस्त्यालगत मोहन तवाडे यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट पडून मृत्यु झाल्याची घटना बुधवारी (दि.१५) सायंकाळी उघडकीस आली. वनविभागाच्या कंपार्टमेंट क्रमांक ६६० ला लागून असलेल्या शेतात ही घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार देवपायली-मोगरा रस्त्यालगत मोहन तवाडे यांचे शेत असून त्यांच्या शेतात विना तोंडीची जुनी विहीर आहे. दरम्यान बुधवारी तवाडे आपल्या शेतावर गेले असता त्यांना विहिरीच्या परिसरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी विहिरीजवळ जावून पाहिले असता त्यात एक बिबट पडला असल्याचे आढळले. त्यांनी लगेच याची माहिती सहवनक्षेत्र कार्यालय कोहमाराच्या वन अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी बुधवारी सायंकाळी ६ वाजता घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान हा बिबट दोन दिवसांपुर्वीच विहिरीत पडला असल्याचा अंदाज लावला जात आहे. या प्रकरणाचा तपास सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे, क्षेत्र सहाय्यक नरेंद्र वाढई, वनरक्षक प्रदीप हत्तीमारे पुढील करीत आहेत.विना तोंडीच्या विहिरी ठरताहेत कर्दळकाळनवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्प सडक अर्जुनी तालुक्याला लागून असल्याने या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. या परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात विना तोंडीच्या विहिरी आहेत. दरम्यान शेतातून भटकंती करताना रात्रीच्या वेळेस वन्यप्राणी या विहिरीतून पडून त्यांचा मृत्यु झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या विना तोंडीच्या विहिरी वनप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. या विहिरींना लोखंडी कठडे लावण्याची गरज आहे.