साखरीटोला : चरण्यासाठी नेताना बैलजोडीला विद्युत धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना सालेकसा तालुक्यातील नदीटोला येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, संकट कोसळले आहे.
प्राप्त माहितीनुसार ग्रामपंचायत भजेपार अंतर्गत येणाऱ्या नदीटोला येथील शेतकरी आत्माराम बिसन कल्चर हे मंगळवारी (दि. २) हे आपल्या बैलजोडीला चरण्यासाठी नेत असताना नदीटोला येथून वाहणाऱ्या वाघनदीत जिवंत विद्युत तार कोसळून त्याच्या बैलांना धक्का लागल्याने दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. यामुळे कल्चर यांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय, बैलजोडीअभावी त्यांना उन्हाळी हंगामाला मुकावे लागणार आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ता देवराम चुटे, बोदलंबोडीचे सरपंच गीता नाईक, उपसरपंच नारायण गेडाम, भजेपार ग्रामपंचायतचे उपसरपंच कैलास बहेकार, पोलीस पाटील सूरजलाल हत्तीमारे, ग्रामपंचायत बोदलंबोडीचे सचिव के. सी, कोंबडीबुरे, लखनलाल बहेकार यांनी घटनास्थळी पोहचून माहिती घेतली. तसेच कल्चर यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. पोलीस विभागाचे कर्मचारी नरेंद्र हिवरे, विजय हुमने, विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी विधाते, उईके यांनी पंचनामा करून तहसील कार्यालयाला माहिती दिली.