मुलांनी दिली वडिलांना धमकी
गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम ढाकणी येथील हेमराज सोमाजी हिरापुरे (वय ५०) यांनी आपल्या मुलांना माझ्या घरात राहू नका, असे म्हटले असता, आरोपी मुलगा नरेंद्र हेमराज हिरापुरे (३३), सुरेंद्र हेमराज हिरापुरे (२६) व सुनील सोमाजी हिरापुरे यांनी त्यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेसंदर्भात २० जुलैरोजी शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
घरासमोर लघुशंका करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
गोंदिया : शहरातील गौतमनगर बाजपाई वाॅर्डातील आरोपी खुर्शिद सय्यद (वय ४५) व रुकसाना खुर्शीद सय्यद (४२) हे दोघे योगराज दुलिचंद चव्हाण (२४) यांच्या घरासमोर शौच व लघुशंका करीत असल्याने योगराजच्या आईने त्यांना मनाई केली. दरम्यान, आरोपींनी शिवीगाळ करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेसंदर्भात शहर पोलिसांनी २० जुलैरोजी आरोपींवर ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वाद सोडविण्यास गेलेल्या तरुणाला मारहाण
गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत बाजपाई वॉर्डातील शितलामाता मंदिरजवळ येथील कन्हैयालाल चतरे यांच्यासोबत वाद सुरू असताना, वाद सोडविण्यासाठी आवेश कन्हैयालाल चतरे (वय २१, रा. गौतमनगर) हा गेला. मात्र आरोपी रोशनलाल बिसेन (२५, रा. बाजपाई वाॅर्ड, गौतमनगर) याने त्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की करीत मारहाण केली. यासंदर्भात २० जुलैरोजी शहर पोलिसांनी आरोपींवर भादंविच्या कलम ३२३,५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पैशांच्या वादातून ठार करण्याची धमकी
गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम फुलचूर येथील कमलदास उदयलाल उपराडे (वय ४०) हे १९ जुलैरोजी सकाळी ११.३० वाजता मनोहर चौकात असताना दोन आरोपींनी त्यांना दलालीचे पैसे दिले नाही म्हणून शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. कमलदास उपराडे यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये दुर्गाप्रसाद संपतराव चिखलोंडे (५०, रा. सिव्हिल लाईन) यांच्याकडील प्लॉट खरेदी केला होता. त्या प्लाॅटच्या दलालीचे पैसे दिले तरीही ५० हजार रुपये दलाली दिली नाही म्हणून आरोपींनी कमलदास यांच्या दुकानासमोर येऊन शिवीगाळ केली. यासंदर्भात शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुकानासमोर आढळला मृतदेह
गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ज्योती फॅशन या दुकानासमोर २० जुलैरोजी सकाळी ८ वाजता एकाचा मृतदेह आढळला. दामोदर सुकाजी मुनेश्वर (वय ५५, रा. दतोरा) असे मृताचे नाव आहे. आशिष दामोदर मुनेश्वर (२२) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस नाईक राणे करीत आहेत.