गोंदिया : कोरोनामुळे बघता-बघता जिल्हयात वर्षभरात १९२ रुग्णांचा जीव गेल्याची नोंद आहे. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत कोरोनाने १९२ जणांना गिळले आहे. ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली असून, जिल्ह्यातील मृत्यूसंख्या व्दिशतकाकडे वाटचाल करीत आहे. कोरोनाचा कहर सुरू असतानाही जिल्हावासी मात्र आपल्याच मस्तीत असून, त्यांच्यात किंचीतही गांभीर्य आले नसल्याचे दिसत आहे.
राज्यात कोरोनाने पुन्हा आपले पाय पसरले असून, त्याचे पडसाद आता जिल्ह्यातही दिसत आहेत. बोटावर मोजण्याएवढे रुग्ण निघत असतानाच आता मात्र दररोज २०० हून अधिक रुग्णांची नोंद घेतली जात आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांसोबतच मृत्यूचा आकडाही वाढत चालला असून, वर्षभरात कोरोनाने जिल्ह्यात १९२ रुग्णांचा जीव घेतला आहे. यामध्ये तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे.
कोरोनाचा होत असलेला उद्रेक बघता, शासनाने सर्वांनाच कोरोनाविषयक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी काही निर्बंधही लावण्यात आले आहेत. मात्र जिल्हावासीयांना त्याचे काहीच घेणे-देणे दिसून येत नसून, यामुळेच सर्वांचा मनमर्जी कारभार दिसून येत आहे. कित्येक नागरिक एवढ्या गंभीर स्थितीतही मास्क न लावता फिरताना दिसतात. शारीरिक अंतराचे पालन करण्याचे तर सोडून द्या; मात्र हा अतिरेक अंगलट येऊन हेच कारण आहे की, मृत्यू संख्या व्दिशतकाकडे जाताना दिसत आहे.
--------------------------------
प्रशासनाच्या कठोरतेची गरज
मध्यंतरी महसूल व नगर परिषदेने तयार केलेल्या पथकांनी एक दिवस कारवाई करून सुमारे ७२ हजार रुपयांचा दंड नागरिकांना आकारला. यामुळे आता प्रशासन कठोर पाऊल उचलत असल्याचे वाटू लागले होते; मात्र त्यानंतर या पथकांच्या कारवायांबाबत काहीच माहिती नसून, हे पथक कोठे गेले, हेच कळेनासे झाले आहे. परिणामी नागरिकांनी पुन्हा रान मोकळे असून, मास्क न लावता फिरणे व शारीरिक अंतराचे पालन या मुख्य उपाययोजनांना बगल देत आहे.
--------------------------
गोंदिया तालुक्यात तब्बल १०८ रुग्णांचा मृत्यू
कोरोनाने मागील मार्च महिन्यात जिल्हयात प्रवेश केला व त्याला आता १ वर्ष झाले असून, या कालावधीत आतापर्यंत १९२ रुग्णांचा जीव गेला आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीपासूनच कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या गोंदिया तालुक्यात तब्बल १०८ रुग्णांचा जीव कोरोनाने घेतला आहे. मात्र त्यानंतरही गोंदिया तालुक्यातील प्रामुख्याने शहरातील चित्र बघता, नागरिकांनी कोरोनाला आता गमतीत घेतल्याचे वाटत आहे. मात्र ज्यांच्या घरातील व्यक्ती जाते त्यांनाच कोरोना काय आहे, याची जाणीव असल्याने गांभीर्याने वागण्याची गरज आहे.
---------------------------------------
जिल्ह्यातील मृतांचा तालुकानिहाय तक्ता
तालुका मृत्यू संख्या
गोंदिया १०८
तिरोडा २ ५
गोरेगाव ७
आमगाव १३
सालेकसा ३
देवरी १०
सडक-अर्जुनी ५
अर्जुनी-मोरगाव ११
इतर राज्य व जिल्हयातील १०
एकूण १९२