गोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. याअंतर्गत १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातील शहरी आणि ग्रामीण भागांत चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र एप्रिल महिन्यात कोरोनाच्या लसीकरणाला घेऊन विविध अफवांना सुरुवात झाली. त्यामुळे याचा परिणाम लसीकरणाच्या मोहिमेवर झाला आहे. लसीकरणासंदर्भात ग्रामीण भागात, लस घेतल्याने मृत्यू होतो, शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात, व्यक्ती निपुत्रिक होते, लस घेतल्याने अकाली मृत्यू होतो अशा अफवा नागरिकांमध्ये होत्या. त्यामुळे लसीकरणासाठी नागरिक पुढे येत नव्हते. मात्र या अफवांवर विश्वास न ठेवू नका, असे आवाहन आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित असून कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये झालेले गैरसमज दूर करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जनजागृती करण्यात आली. गावातील प्रत्येक कुटुंबाला भेटी देऊन लस पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री गावकऱ्यांना पटवून देण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांनाही चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली.
..................
काय आहेत अफवा....
शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात, खूप ताप येतो आणि चक्कर येऊन मृत्यू होतो, अशी अफवा गोंदिया तालुक्यातील नागरा, रजेगाव, रावणवाडी, कामठा या परिसरांतील गावकऱ्यांमध्ये पसरविण्यात आली. त्यामुळे नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नव्हते. मात्र ही केवळ अफवा असल्याचे सांगून, गावातील तरुण आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांचा संभ्रम दूर केला.
...............
निपुत्रिक होण्याची शक्यता
लस घेतल्यानंतर निपुत्रिक होण्याची शक्यता असते, अशीही अफवा ग्रामीण भागात पसरविण्यात आली. त्यामुळे गावातील महिला लसीकरणासाठी पुढे येत नव्हत्या. त्यामुळे गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि शिक्षकांनी पुढाकार घेत त्यांच्यातील शंका दूर करण्याचे काम केले. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लस घेण्यास सांगितले.
.....
लस घेतल्याने होतो मृत्यू
कोरोनाची लस घेतल्यानंतर सात-आठ दिवसांनी मृत्यू होतो, अशी अफवा सर्वाधिक ग्रामीण आणि दुर्गम भागांतील नागरिकांमध्ये पसरविण्यात आली. त्यामुळे नागरिक लसीकरणासाठी केंद्रावर येत नव्हते. यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन त्यांचे गैरसमज दूर केले. त्यानंतर लसीकरणासाठी नागरिक पुढे येऊ लागले.
...............................
गावकरी संभ्रमात
सुरुवातीला कोरोना लसीकरण करून घ्यायचे असे ठरविले होते. मात्र गावात लसीकरणासंदर्भात विविध अफवा सुरू झाल्या. त्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याने लस घेणे टाळले होते. मात्र गावातील पदाधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले व गैरसमज दूर केले. त्यानंतर केंद्रावर जाऊन लस घेतली.
- एक ग्रामस्थ, नागरा
.......................
कुठलीही मोहीम येण्यापूर्वी तिची अफवा पहिली होत असते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा अशा अफवांवर लवकर विश्वास बसतो. तसेच कोरोना लसीकरणाचे झाले. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लस पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री पटल्याने लस घेतली.
- एक ग्रामस्थ, कामठी
.................
अधिकारी म्हणतात....
कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील प्रतिबंधात्मक लस हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. शासनाच्या दिशानिर्देशानुसार लसीकरण मोहीम राबविली जात आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी बिनधास्तपणे लस घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्याधिकारी.
....................
ग्रामीण भागात झालेले लसीकरण
आरोग्य कर्मचारी ५४३६ ३५४२ २३४
फ्रंटलाईन वर्कर्स ११६५४ ९८७६ २४३५
ज्येष्ठ नागरिक ४६४३२ ३३४५३ १०८६५
४५ ते ६० वयोगट ३५४७७ २८७६५ ३४५३
१८ ते ४४ वयोगट ४३२१ ० २५४३५