देवरी, (गोंदिया) : तालुक्यातील सावली येथील एका युवतीचा घराच्या छतावरून पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचे नाव दीक्षा देवनाथ बिंझलेकर (वय २४) असे आहे.
प्राप्त माहितीनुसार दीक्षा ही आज काही कामानिमित्त घराच्या छतावर गेली असल्याचे सांगण्यात येते. छतावरून तिचा तोल गेल्याने ती खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सदर युवती ही व्यवसायाने इंजिनिअर असून ती नागपूरच्या एका खासगी कंपनी कार्यरत असल्याची माहिती आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यात तिचा साखरपुडा गोंदिया तालुक्यातील तुमखेडा येथील युवकाशी झाला होता. या घटनेने सावली गावात शोककळा पसरली आहे.