शेतकरी संकटात : परतफेडीवरून वाढली चिंतामुंडीकोटा : कसेतरी कर्ज घेऊन शेतकरी शेती करीत आहेत. त्यातही निसर्गाच्या माराने यंदाचे धान पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले. जवळ होते नव्हते ते लावूनही हाती काहीच आले नसल्याची शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. असे असतानाही बँकांकडून मात्र वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. आता जवळ काहीच नसल्याने कर्जाची परतफेड कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. तिरोडा तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेती करने हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. पण शेती करने शेतकऱ्यांना परवडण्यासारखे राहिले नाही. पण वडीलांची परंपरा सुरु ठेवावी लागते असे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. अशातच मजुरी, रासायनिक खते, कीटकनाशक औषधी याचे दर गगनाला भिडले आहेत. नेहमीच निसर्गाच्या अवकृपेमुळे कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ याप्रकारे शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.भारत देश कृषिप्रधान देश आहे. गोंदिया व भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दोन्ही जिल्हे भाताच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र आजही कित्येक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने त्यांना वरथेंबी पावसावरच शेती करावी लागते. त्यातही बंँकांकडून कर्ज घेऊन शेती करावी लागत असल्याचे चित्र आहे. यंदा ऐनवेळी पावसाने दगा दिला. त्यात रोगराईने धान पिकाची नासाडी झाली. ज्या शेतकऱ्याकडे हलके धान होते. त्यांनी कापनी व मळणी करुन दिवाळीचा सण तोंडावर येताच व्यापाऱ्यांना कमी दरात विक्री करुन आपली दिवाळी साजरी केली.व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे धान कमी भावात घेऊन त्यांची लूबाडणूक करुन दिशाभूल केली. पण गरजवंतांना अक्कल नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झाली. पर्यायाने बँकेकडून किंवा सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर शेतकऱ्यांकडून केली जात नाही. त्यातल्या त्यात मुला-मुलींचे लग्न, शिक्षण व वर्षभरातील संसाराचा गाडा चालविणे फार कठिण झाले आहे. रात्रंदिवस काबाळकष्ट करुनही यावेळी पोटासाठी भाकर मिळणे कठिण झाले आहे. नेहमीच शेतकरी घामाचे थेंब गाळून परिश्रम करीत असतो. पण वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच येत नाही. शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्जाची उचल केली आहे. पण परतफेड करावी अशी या चिंतेत सापडला आहे. असे असतानाही बँकांकडून वसुलीचा तगादा सुरु झालेला दिसत आहे. अशावेळी काय वसुली देणार? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. या सर्वच बाबीला कंटाळून शेतकरी शेवटी आत्महत्येसारखे पाऊल उचलतात. शेतकऱ्यांच्या समस्या आणखी जटील झाल्या असून शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. पण अशावेळी ना नेता, ना पुढारी कोणीही शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. मग गरीब शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला दिसत आहे. अच्छे दिनाच्या ऐवजी शेतकऱ्यांना बुरे दिन पाहण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)
कर्जवसुलीचा तगादा सुरु
By admin | Published: January 13, 2016 2:31 AM