गोंदिया : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी व भविष्यातील उपाययोजना करण्यात यावी. यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांना घेऊन सोमवारी (दि. ६) तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची पावसाअभावी रोवणी होऊ शकली नाही. तसेच पिकांना वेळोवेळी लागणारा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, यावर्षी धानाच्या उत्पादनावर मोठा परिणाम पडून शेतकरी आर्थिक संकटात सापडणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शासनाने आता जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करावे. तसेच शेतकऱ्यांना बोनसची उर्वरित रक्कम व रब्बी धानाचे चुकारे अविलंब देण्यात यावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान त्वरित देण्यात यावे, जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असताना बोअरवेल व विहिरीतून पाण्याची व्यवस्था करण्यासाठी कृषिपंपासाठी २४ तास वीज देण्यात यावी व शेतकऱ्यांचे वीज जोडणी न कापता त्यांचे बिल माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, धनेंद्र अटरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक कदम, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, नरेंद्र तुरकर, मनोज मेंढे, देवचंद नागपुरे, अर्जुन नागपुरे, सत्यम बहेकार, बंडू मानकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.