गोंदिया : सर्वसामान्य नागरिकांना आपलीशी वाटणारी लालपरी दरवर्षी एसटी महामंडळाच्या एसटी बसेसचा वापर प्रासंगिक करारासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. यामध्ये शाळा, महाविद्यालयाच्या शैक्षणिक सहली आयोजन करण्यात येते. त्यासाठी विशेष करुन महामंडळाच्या बसेसचा वापर करण्यात येतो. लग्न सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने एसटी बसेस प्रासंगिक करारावर आरक्षित केल्या जातात. मागील वर्षीपासून कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाचा फटका सर्वसामान्य नागरिकांस एसटी महामंडळाच्या गोंदिया आगाराला बसला आहे.
कोरोनामुळे सध्या शाळा, महाविद्यालये बंद आहेत. लग्न सोहळ्यात मोजक्याच नागरिकांची उपस्थिती असल्याने, नागरिकांनी लग्न सोहळ्यासाठी बसेसचे प्रासंगिक करारावरील आरक्षण करीत नसल्याने महामंडळाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. परिणामी, कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी दरवर्षी सहलीला जाण्यासाठी उत्सूक असतात, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावेळी शाळा महाविद्यालय बंद असल्याने, विद्यार्थ्यांच्या सहलीच्या आनंदावर विरजन पडले आहे. कोरोनामुळे यंदा सहलीच झाल्या नाहीत. याचे मोठे नुकसान एसटी महामंडळाला बसले. मार्च, २०२० पासून जिल्ह्यासह सर्वत्र कोरोना विषाणूच्या संकटामुळे सर्वच चिंतेचे वातावरण पसरले आहे. जून महिन्यापासून टप्प्याटप्प्याने अनलॉक केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येताच, यात शिथिलता देण्यात आली होती. मात्र, मागील महिनाभरापासून पुन्हा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बसेसच्या फेऱ्या कमी झाल्या आहे. मागील पंधरा दिवसांपासून मोजक्याच बसफेऱ्या सुरू असल्याने, महामंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. डिझेलचा खर्चही भरून निघत नसल्याचे चित्र आहे.