लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवीन बाधिताची नोंद नसल्याने जिल्हावासीयांना दिलासादायक वातावरण असतानाच शनिवारी (दि.१६) जिल्ह्यातील एक्टिव्ह रुग्णांमधील एकाने कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर आता जिल्ह्यात ३ एक्टिव्ह रुग्ण उरले असून नवीन बाधिताची नोंद नसल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र तरीही नागरिकांनी गर्दी टाळता नियमांचे पालन करण्याची गरज आहेच.मध्यंतरी जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढताना दिसून आली व थेट ९ एक्टिव्ह रुग्ण झाले होते. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कोरोना पुन्हा पाय पसरणार असे वाटू लागले होते. मात्र मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नवीन बाधिताची नोंद झालेली नाही. नवरात्रीतही बाधित न वाढल्याने जिल्हावासीयांना तेवढाच दिलासा होता. मात्र जिल्ह्यात ४ एक्टिव्ह रुग्ण होते. आता शनिवारी (दि.१६) जिल्ह्यात नवीन बाधिताची नोंद नसतानाच एका एक्टिव्ह रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ३ एक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. आता नवरात्री संपली असून एवढ्या गर्दीतही कोरोनाला पाय पसरता आले नाही ही दिलासादायक बाब आहे. मात्र पुढे दिवाळी असून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गर्दी वाढणार आहे. अशात नागरिकांनी उगाच धोका पत्करण्यापेक्षा नियमांचे पालन करूनच दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याची गरज आहे. तसेच दुकानदारांनी स्वत:सह ग्राहकांच्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करूनच व्यापार करणे सुरक्षित राहील. जिल्ह्यात लागले १२२९५१० डोस - जिल्ह्यात लसीकरण जोमात असून आतापर्यंत १२२९५१० ड़ोसचे लसीकरण करण्यात आले आहेत. यामध्ये ८२६५९२ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ४१७९६० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. मात्र त्यानंतरही कित्येक नागरिक लसीकरण टाळताना दिसत आहे. मात्र लस घेऊनच आपण कोरोनापासून सुरक्षित राहू शकतो हे स्पष्ट झाले आहे. प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे. ९८ चाचण्या निगेटिव्ह - जिल्ह्यात आतापर्यंत ४५८७३५ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये २३७०२६ आरटी-पीसीआर चाचण्या असून २२१७०९ रॅपिड ॲंटिजन चाचण्या आहेत. तर शुक्रवारी ९८ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात एकही बाधित आढळलेला नसल्याने शनिवारीही नवीन बाधिताची नोंद घेण्यात आलेली नाही.