राजकुमार बडोलेंसह ३५ कार्यकर्त्यांचा संकल्प गोंदिया : जीवन कितीही सुंदर असले तरी, मृत्यू हा अटळ आहे. त्यामुळे माणसाने जिवंतपणी परोपकाराची भावना जोपासून मनुष्य धर्माचे पालन केले असले तरी, मरणोपरांत अनेकांना जीवन देण्यासाठी देह खर्ची घालणे, ही अनुभूती वेगळीच आहे. आज अनेक रुग्णांना मानवी शरिराच्या अवयवांची आवश्यकता असते. परंतु कधी आर्थिक परिस्थिती तर कधी उपलब्धता नसल्यामुळे रुग्णांचे वेळेवर उपचार होत नाही. त्यामुळे प्रत्येक मनुष्याने मरणोपरांत देहाचे दान केल्यास निश्चितच मानवी जन्म सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. देहदान हे श्रेष्ठदान आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ते त्यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित वैद्यकीय महाविद्यालय व पीपल्स रु लर इन्वायरमेंट यांच्या संयुक्तवतीने आयोजित अवयव व देहदान संकल्प शिबिरात बोलत होते. यावेळी प्रामुख्याने माजी विधान परिषद सदस्य केशवराव मानकर, नगराध्यक्ष अशोक इंगळे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. च्या पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, भाजपा जिल्हा महामंत्री भाऊराव उके, नामदार बडोले यांच्या पत्नी शारदा बडोले, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जि.प.चे समाज कल्याण अधिकारी रामटेके, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, भाजपा शहर अध्यक्ष सुनील केलनका, न.प. सदस्य भरत क्षत्रिय, जयंत शुक्ला, राहुल जोशी, हिदायत शेख यांच्यासह मोठ्या संख्येत मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना बडोले यांनी, आजघडीला देशात रुग्णांना अनेकदा अवयवांची आवश्यकता असते. मात्र अजुनही या विषयावर जनजागृती न झाल्याने मरणोपरांत देहदानाची संकल्पनाही केवळ संकल्पनाच ठरत आहे. यामुळे अनेकदा मानवी अवयवांच्या तस्करींचे प्रकरणही पुढे आले आहे. त्यामुळे प्रत्येकाने मरणोपरांत देहदान करण्याचे आवाहनही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. यावेळी विनोद अग्रवाल, डॉ. केविलया, केशवराव मानकर यांनी या विषयावर समायोचित विचार व्यक्त केले. विशेष म्हणजे स्वत: नामदार बडोलेंसह ३५ नागरिकांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मरणोपरांत देहदान करण्याचा संकल्प घेतला आहे. संचालन धनजंय वैद्य यांनी केले. आभार बसंत गणवीर यांनी मानले. कार्यक्रमासाठी महेश ठवरे, बागळे, अंजू वैद्य, निलिमा पुरी, पोर्णिमा गोंडाने, योगेश राऊत, संदीप डोंगरे, गौतम गणवीर यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
देहदान हेच श्रेष्ठदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2017 1:21 AM