लोकमत न्यूज नेटवर्क देवरी : शासनाद्वारे रस्ता विकास योजनेतून मंजूर झालेले देवरीच्या बौध्द विहारालगत चिचगड रोड मार्गावरून सेडेपार रोड मार्गावरील फिरोज खान यांच्या घरापर्यंत अंदाजे १७ लाख रुपये निधीचे रस्ता बांधकाम केले जात आहे. यात रस्त्याच्या साईड ब्लॉकच्या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याची तक्रार देवरी येथील नागरिकांनी केली आहे. या कामात नगर पंचायत प्रशासनाने लक्ष देऊन सदर बांधकाम योग्यरित्या अंदाजपत्रकाप्रमाणे करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून बौध्दविहार लगत चिचगड रोडवरून सेडेपार रोड जोडरस्ता पूर्णपणे उखडलेला होता. या रस्त्याच्या बांधकामासाठी येथील नागरिकांची रास्त मागणी होती. यावरून येथील आ. संजय पुराम यांच्या प्रयत्नाने रस्ता विकास योजनेतून या रस्ता बांधकाम मंजूर करून घेतला. सदर रस्ता बांधकामासाठी १७ लाखांचा निधी मंजूर करुन या कामाची पूर्ण जवाबदारी नगर पंचायत प्रशासनाला देण्यात आल्याचे समजते. या रस्ता बांधकामासाठी ई-निविदा काढण्यात आले. यात गोंदियाचे कंत्राटदार रविकांत भरणे यांना हा बांधकाम मंजूर करण्यात आला. या रस्त्याचे बांधकाम सुरु असताना कंत्राटदारांनी सदर रस्ता बांधकाम मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे न करता या रस्त्याच्या साईड ब्लॉकच्या कामात ८ एमएमची गिट्टी न वापरता बोल्डर दगड वापरुन माती मिश्रीत मुरुम टाकून काम केले. हे साईड ब्लॉकचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून हे काम व पुढे होणारे इतर बांधकाम हे अंदाजपत्रकानुसार करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. जे साईड ब्लॉकचे कामे झालीत त्याला मोडून पुन्हा योग्यरित्या करावे, अशी मागणीही नगर पंचायत प्रशासनाला नागरिकांनी केली आहे. सदर काम हे नगर पंचायत प्रशासनाच्या देखरेखखाली होत असल्याने सदर बांधकाम योग्यरित्या आणि अंदाज पत्रकानुसार व्हावे, अशी मागणीही येथील नागरिकांनी केली आहे.
रस्ता बांधकामाचा निकृष्ट दर्जा
By admin | Published: June 14, 2017 12:37 AM