शिवसेनेची तक्रार : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेळकाढू धोरण केशोरी : शासनाचे आरोग्य विभाग नागरिकांच्या सेवेसाठी विविध आरोग्याच्या योजना काढून गवगवा करीत असले तरी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा बोजवारा वाजल्याचे तक्रारीवरुन दिसून येत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना व जिल्हा प्रशासनाला पाठविलेल्या तक्रारीत नमूद प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी हे आदिवासी, जंगलव्याप्त भागात असून तालुक्याच्या ठिकाणावरुन शेवटच्या टोकावरुन २५ ते ३० किमी दूर अंतरावरुन या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची दररोज गर्दी दिसून येते. परंतु येथील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे, कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे रुग्णांना आवश्यक सेवा मिळत नाही. अकारण इतर कार्यरत कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असताना एक अधिकारी मुख्यालयी न राहता तालुक्याच्या ठिकाणावरुन ये-जा करीत आहे. त्यांना वेळेचे बंधन नाही. दुसरे अधिकारी आदिवासी भागात दोन वर्षे सेवा अर्जित करुन बदली प्रकरणात अधिक व्यस्त असल्याने त्यांचेही रुग्णांच्या आरोग्याकडे लक्ष नाही. आरोग्य सेवेच्या बाबतीत शासन गंभीर असले तरीही कर्मचाऱ्यांच्या भरतीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. औषधोपचार करताना चपराशांच्या आधार घ्यावा लागतो. त्यांच्या हाताने रुग्णांना सलाईन लावण्याची कामे घेतली जातात. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाढती ओपीडी सर्वांना टेंशन देणारी ठरू पाहात आहे. येथे नियमित वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाही आणि कर्मचाऱ्यांचा अभाव याकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देवून येथील आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी नियमित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी शिवसेना शाखा केशोरीच्या वतीने चेतन दहीकर यांनी केली आहे. (वार्ताहर)
आरोग्य सेवेचा बोजवारा, कर्मचाऱ्यांचा अभाव
By admin | Published: August 19, 2016 1:32 AM