बोंडगावदेवी : वीज वितरण कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे बाक्टी-चान्ना येथीेल पाच शेतकऱ्यांच्या विहिरीच्या मोटारपंपाला वीजपुरवठा करण्यास कमालीचा विलंब होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना पिके घेण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
बाक्टी येथील एकनाथ शहारे या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमान योजनेअंतर्गत शेतामध्ये बोअरवेलसह विहीर खोदली. त्यांच्याच शेतशिवाराजवळील अन्य चार शेतकऱ्यांनी शेतात विहीर खोदली आहे. स्वत:च्या शेतामध्ये पाण्याची सोय झाल्याने बारमाही पिके घेण्याची संधी त्या शेतकऱ्यांना चालून आली. या विहिरीच्या पाण्यातून सिंचन होण्यासाठी विद्युतपुरवठा व्हावा या हेतुने शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह वीजवितरण कंपनीकडे अर्ज केला. मागीलवर्षी २५ फेब्रुवारी २०२० रोजी डिमांड ५ हजार ८०७ रुपयाचा भरणा सुध्दा केला. तब्बल एक वर्षाचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना विद्युतपुरवठा सुरू करण्यासाठी वीज वितरण कंपनीने कुठलेच पाऊल उचलले नाही. परिणामी शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्यापासून वंचित रहावे लागत आहे.